कृषी अभ्यास मंडळांतर्गत शेतीविषयक चर्चा
By Admin | Updated: October 18, 2014 01:50 IST2014-10-18T01:50:14+5:302014-10-18T01:50:14+5:30
श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरी वर्धा अंतर्गत सामुदायिक विकास व विस्तार विभागातर्फे महाविद्यालयात..

कृषी अभ्यास मंडळांतर्गत शेतीविषयक चर्चा
वर्धा : श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिपरी वर्धा अंतर्गत सामुदायिक विकास व विस्तार विभागातर्फे महाविद्यालयात कृषी अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात येऊन अनेक शेतीविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेश नेमाडे, उपप्राचार्य एम.एम. पवार वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय कानोडे व कृषी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी खुनकर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम प्रा. शिरीष सुतार यांनी प्रास्ताविकात मंडळाचा व त्याद्वारे घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबत माहिती दिली.
डॉ. संजय कानोडे यांनी कृषी अभ्यास मंडळाच्या सदस्याने विस्तार कार्यकर्त्यांची भूमिका पार पाडत शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करावा, असे मत व्यक्त करून उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना स्वच्छता राखण्याबाबत शपथ दिली. कृषी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी खुनकर यांनी कृषी अभ्यास मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या कार्याची माहिती सादर केली आणि विद्यार्थी व शेतकरी यांना जोडणारा दुवा म्हणून मंडळ कार्य करेल असे प्रतिपादन केले.
उपप्राचार्य प्रा. पवार यांनी कृषी अभ्यास मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करण्यासाठी याचा फायदा होत असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सुरेश नेमाडे यांनी मंडळामार्फत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे, त्या बाबतची तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर तरूण मंडळीचा स्वत:च्या शेतीमध्ये सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी मंडळाने कार्य करावे, असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषी अभ्यास मंडळामार्फत शेतकऱ्यांना परंपरागत शेतीसोबत विज्ञान तंत्रज्ञानाची जोड देण्यावर भर दिला. युवकांची शेतीशी नाळ तुटत चालली आहे. परंतु शेती समृद्ध करण्यासाठी युवकांची मातीशी नाळ पुन्हा जोडली जाणे आवश्यक असून मंडळाने त्यामार्गाने विधायक प्रयत्न करावे, असेही ते यावेळी म्हणाले.
संचालन डॉ. रतन चौधरी यांनी केले. आभार डॉ. अजय किनखेडकर यांनी मानले. कृषी अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष अमर पाटील, कोषाध्यक्ष अर्चना घोंगडे, सचिव आरती गायकवाड व सहसचिव म्हणून अश्विनी बुधबावरे व इतर सदस्यांचा समावेश आहे. त्यानीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)