संतप्त शेतकऱ्याने ओतले जिल्हाकचेरीपुढे दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:35 IST2018-05-09T00:35:20+5:302018-05-09T00:35:20+5:30
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाची जोड द्यावी, असे पुढाऱ्यांसह समाजातील सर्वच नेत्यांकडून सांगितले जाते; परंतु, दूध संघाच्या चुकीच्या निकषामुळे शेतकरी तथा दुग्ध उत्पादक मेटाकुटीस आले आहे.

संतप्त शेतकऱ्याने ओतले जिल्हाकचेरीपुढे दूध
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाची जोड द्यावी, असे पुढाऱ्यांसह समाजातील सर्वच नेत्यांकडून सांगितले जाते; परंतु, दूध संघाच्या चुकीच्या निकषामुळे शेतकरी तथा दुग्ध उत्पादक मेटाकुटीस आले आहे. याच अटीमुळे त्रस्त झालेल्या अल्लीपूर येथील प्रितम वनधने नामक दूध उत्पादकाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.
संतप्त शेतकरी प्रितम वरधने यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्याकडील दूध खरेदीसाठी संबंधितांकडून विविध कारणे पुढे करीत होत असलेल्या टाळाटाळाला कंटाळून जिल्हाकचेरीसमोर दूध ओतले. अल्लीपूर येथील गुरुदेव दूध उत्पादक सहकारी संस्थाच्यावतीने परिसरातील ८० दूध उत्पादकांकडून दूध गोळा करून शासकीय दुग्ध डेअरीत पाढविल्या जाते; पण याठिकाणी दूध असलेल्या १३ पैकी ६ कॅन ठेऊन बाकी कॅन प्रोटीन कमी असल्याचे सांगून परत करण्यात आले. त्याबाबत संबंधितांना तक्रार करूनही कुठलीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप यावेळी या आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने केला. दूध संघ चुकीचे निकष पुढे करीत शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. हा प्रकार नित्याचा झाला असून याचा नाहक त्रास दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी शेतकरी प्रितम वनधने यांनी केली. सदर संतप्त शेतकऱ्याने चक्क १३ कॅन दूध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.