हिंगणघाट पालिकेत अग्रीम रकमेचा घोळ
By Admin | Updated: January 20, 2015 00:09 IST2015-01-20T00:09:51+5:302015-01-20T00:09:51+5:30
येथील नगरपरिषदेत अग्रीम रक्कम उचलण्यात घोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पालिकेत पाच वर्षात १४ जणांनी एकूण ७ लाख ७५ हजार ७५३ रुपयांची उचल करण्यात आली. मात्र एकानेही

हिंगणघाट पालिकेत अग्रीम रकमेचा घोळ
५वर्षात १४ जणांकडून आठ लाखांची उचल
भास्कर कलोडे - हिंगणघाट
येथील नगरपरिषदेत अग्रीम रक्कम उचलण्यात घोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पालिकेत पाच वर्षात १४ जणांनी एकूण ७ लाख ७५ हजार ७५३ रुपयांची उचल करण्यात आली. मात्र एकानेही त्या रकमेचा कुठलाही हिशेब सादर केला नाही. यामुळे ही अग्रीम रक्कम उचल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पाऊल पालिका प्रशासनाच्यावतीने उचलण्यात येणार असल्याची माहिती आहे.
न.पा. अंतर्गत तातडीच्या कामाची पूर्तता व्हावी म्हणून विविध विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांनाही अग्रीम राशी देण्याची नगरपरिषदेत तरतुद आहे. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी त्या कामासाठी लागलेल्या वस्तु, मजुरी, भाडे आदींची देयके कामानंतर सादर करण्याची मुभा केली आहे. यानुसार नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन २०१० ते २०१४ या वित्तीय वर्षात विविध कामांसाठी एकूण ७ लाख ७५ हजार ७५३ रुपयांची अग्रीम उचल केली. याला पाच वर्षांचा कालावधी होत असला तरी एकाही अधिकारी वा कर्मचाऱ्याने पालिकेत हिशोब सादर केला नाही. यामुळे पालिकेच्या हिशेबात गबड होत आहे.
या अग्रीम राशीपैकी ५ लाख ४० हजार रुपयांची उचल चार अधिकाऱ्यांनी केली असून उर्वरीत ३ लाख ३५ हजार रुपयांची उचल पालिका अभियंत्यासह स्थायी व अस्थायी कर्मचाऱ्यांनी केली आहे. गत पाच वर्षात उचल केलेल्या अग्रीम रक्कमेचा हिशोब द्यावा म्हणून लेखा विभागाने संबंधीतांना अनेक वेळा सूचना व नोटीस देवून सुद्धा त्यांनी हिशोब सादर केले नाही. वेळप्रसंगी त्यांचे वेतन सुद्धा रोखून धरण्यात आले; परंतु संबंधीतांनी वेळ मारून नेल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अग्रीम रक्कमेच्या समायोजनासाठी कठोर कारवाईची गरज आहे. अन्यथा संबंधीतांकडील थकबाकी वसूल होण्यासाठी त्यांच्या निवृत्तीची प्रतीक्षा नगरपरिषदेला पहावी लागणार आहे.