पुन्हा वादळी पावसाचा तडाखा
By Admin | Updated: March 11, 2015 01:43 IST2015-03-11T01:43:03+5:302015-03-11T01:43:03+5:30
जिल्ह्यात गत आवड्यात आलेल्या वादळी पावसाच्या खुना सुकते न सुकते सोमवारी रात्री पुन्हा जिल्ह्यातील काही भागात वादळा पावसाने कहर केला.

पुन्हा वादळी पावसाचा तडाखा
कारंजा(घाडगे), देवळी : जिल्ह्यात गत आवड्यात आलेल्या वादळी पावसाच्या खुना सुकते न सुकते सोमवारी रात्री पुन्हा जिल्ह्यातील काही भागात वादळा पावसाने कहर केला. यात कारंजा व देवळी तालुक्यातील काही भागात आलेल्या या वादळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी पावसासह गारपीट झाल्याने चना, गहू या पिकांसह संत्रा उत्पाकांचा पट्टा असलेल्या या भागात संत्र्याचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरात आलेल्या वादळी पावसामुळे भिडी नजीक झाड कोसळल्याने यवतमाळ-वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा हे झाड तोडल्याने वाहतूक सुरळीत झाली. तर कारंजा येथे शेतात असलेल्या कृषी पंपाच्या पेटीवर वीज कोसळल्याने पेटी जळून खाक झाली. यात शेतकऱ्याचे नुकसान झाले.
कारंजा तालुक्यातील धर्ती, भालु, बोरी, सोनेगांव, ठाणेगांव या गावांना वादळी वारा व गारपीटीने झोडपले. सर्वाधिक गारपीट धर्ती येथे झाले. सुमारे एक तासभर सुरू असलेल्या या गारपीटीने व मुसळधार पावसाने गहु, चना, संत्रा, व भाजीपाला पिकांचे नुकसान केले. यावेळी झालेल्या गारपीटीत गारांचा मारा इतका जबर होता की अनेकांना घरातील सज्जाचा आश्रय घ्यावा लागला. गारा फावड्याने गोळा कराव्या लागल्या. येथील शेतकरी प्रदीप हिंगवे यांच्या शेतातील संत्र्यासह १० एकरातील चणा एैन संवंगणीच्या वेळी गारपीटीने उद्ध्वस्त झाल. यात त्यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना याचा फटका बसला.
सदर नुकसानीचा प्राथमिक सर्व्हे येथील तलाठी लताड व कृषी सहाय्यक अरुण कुटे यांनी केला. धर्ती येथील सरपंच अनुसया मानमोडे, उपसरपंच व सदस्यांनी विशेष सभा बोलावत सचिव अर्चना धारपुरे यांनी नुकसानीबाबत ठराव घेवुन गावातील १०० शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.
आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची पाठ निसर्ग सोडतांना दिसत नाही. अतिवृष्टी कधी दुष्काळ अशा एक ना अनेक आसमानी संकटाला समोर जात असलेल्या शेतकऱ्यांना आता गारपीटीने झालेले नुकसान मिळणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तसा शासनाचा आदेश असल्याचे सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी/प्रतिनिधी)