पुन्हा महिलाच बसणार
By Admin | Updated: July 12, 2014 01:39 IST2014-07-12T01:39:16+5:302014-07-12T01:39:16+5:30
सदस्य संख्या २३ असलेल्या आर्वी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार असल्याने नवीन नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

पुन्हा महिलाच बसणार
सुरेंद्र डाफ आर्वी
सदस्य संख्या २३ असलेल्या आर्वी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार असल्याने नवीन नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. आर्वी न.प.च्या नवीन नगराध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा महिलाच विराजमान होणार आहे. पुढील अडीच वर्षासाठी नवीन नगराध्यक्षपद हे खुला प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. यामुळे इच्छूक महिला सदस्य नगराध्यक्षपद आपल्याला मिळावे यासाठी फिल्डींग लावून आहे.
आर्वी नगर परिषदेत सध्या भाजपाकडे बहुमत आहे. भाजपाचे १३ व एक स्वीकृत सदस्य, काँग्रेसकडे नऊ व एक स्वीकृत असे संख्याबळ आहे. यात काँग्रेसकडे सहा महिला तर भाजपात पाच सदस्य आहे. यात बहुमत भाजपाकडे असल्याने या पक्षाच्या महिला सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
काँगे्रस पक्षाच्यावतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राहणार आहे. यात काही घडामोडी झाल्यास सत्ताधारी पक्षाच्यावतीने पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवीन चेहरा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात विद्यमान लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
गत अडीच वर्षांचा नगराध्यक्षाचा कार्यकाळ हा अधिक वादग्रस्त ठरल्याचा ठपका जनमाणसात आहे.भाजपाच्या नगरसेवकात विकास धोरणाबाबत नगराध्यक्षासोबत एकवाक्यता नसल्याने नगराध्यक्षकांनी ‘एकला चलो रे’ भूमिका ठेवत आपला कार्यभार सांभाळला. अडीच वर्षात आर्वी शहराचा विकास रखडला. काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येऊन विद्यमान नगराध्यक्ष भाजपाच्या निकटवर्तीय झाल्या; परंतु यातही विकासाबाबत समन्वय दिसून आला नाही.
पालिकेच्या अर्थसंकल्पात आर्वीतील अनामिका बगीचा, स्वामीसमर्थ उद्यान सौंदर्यीकरणसाठी १० लाखांची तरतुद असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. अनेकांना पदाचे डोहाळे लागले असले तरी नव्या नगराध्यक्ष कोण होईल, याकडे आर्वीकरांचे लक्ष लागून आहे.