माणुसकीचे क्रांतीलढे पुन्हा एकदा लढून पाहू
By Admin | Updated: May 17, 2017 00:41 IST2017-05-17T00:41:44+5:302017-05-17T00:41:44+5:30
सध्याच्या काळात असत्य वाढत चाललेले आहे. माणुसकी हरवताना दिसत आहे. अन्याय, अत्याचाराचे परिसिमता गाठली जात आहे.

माणुसकीचे क्रांतीलढे पुन्हा एकदा लढून पाहू
संमेलनात कवींनी फुंकले रणशिंग : वास्तवाचे विदारक चित्र शब्दांतून केले प्रकट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्याच्या काळात असत्य वाढत चाललेले आहे. माणुसकी हरवताना दिसत आहे. अन्याय, अत्याचाराचे परिसिमता गाठली जात आहे. अशावेळी, ‘झुंज आपुली सत्यासाठी पडलो, हरलो, जरी कोसळलो, माणुसकीचे क्रांतीलढे हे पुन्हा एकदा लढून पाहू’, असे शाब्दिक रणशिंग कवींनी कवितेतून फुंकत एकूणच आजच्या विदारक परिस्थितीवर व अन्यायग्रस्ततेवर आपला आक्रोश व्यक्त केला.
ज्येष्ठ कवी प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सरोजनी खुरगे व दिलीप चरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित कवींनी दर्जेदार व सामाजिक आशयाच्या कविता सादर केल्या. प्रा. प्रमोद नारायणे यांनी ‘समरभूमीवर प्राण अर्पिले मागे सरलो नाही कधी स्वातंत्र्याच्या श्वासासाठी पुन्हा एकदा मरून पाहू’ ही कविता सादर केली.
कवी रमेश खुरगे यांनी ‘हाडा मासांचे अंकूर पोटात ती वाढवते, मरणाच्या यातना सोसून आम्हा जग दाखविते’ अशी आईच्या वेदना व्यक्त करणारी कविता सादर केली. कवी सुनिल सावध यांनीही यावेळी बहारदार कविता सादर केली. दिलीप गायकवाड यांनी चार घडीचे जगणे जीवनास दे भरोसा, वय जगण्याचे व्हावे सत्तर म्हणायचे का? अशी जीवनावर भाष्य करणारी गझल सादर केली. संजय भगत यांनी स्वातंत्र्य आता गरिबांचे राहिले नाही, स्वातंत्र्य धनदांडग्यांचे, गरिबांसाठी काहीच नाही, अशी खंत कवितेतून व्यक्त केली. प्रा. अरविंद पाटील यांनी कवितेतून आदर्श गावाची संकल्पना मांडली. प्रशांत ढोले यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाची व्यथा आपल्या कवितेतून मांडली.
या कवी समंलनात तलम रेशमी साडी, मारूनी खडा कुंभ ओढशी रे सावळ्या तू भिजविले अंग, पाणी भरण्या यमूनेला जात, उठली भीतीने ही कळ सावरे आदी कवीता सादर करण्यात आल्या. गंगाधर पाटील, बबन थुल, जी.के. उरकुडे, वंदना कोल्हे, पुष्पा चौधरी, जनार्दन ददगाळे यांनीही वर्तमान काळावर भाष्य करणाऱ्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कविसंमेलनासाठी डॉ. निरंजन एरकेवार, तुळशीराम वाघमारे, वीणा राऊत, अरविंद भोयर, आशा भोयर, सुषमा पिसे, मंदाकिनी एरकेवार, छाया उरकुडे, हांडे, स्रेहल हुकूम, तेजराम, अमृत चौधरी, भरत गजभिये यांच्यासह तसेच शहरातील गणमान्य व्यक्तींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कवी संमेलनाचे संचालन रामेश्वर भोपळे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार रमेश खुरगे यांनी मानले.