नोटबंदीच्या तीन महिन्यानंतरही बँकांमध्ये चलन तुटवडा कायमच
By Admin | Updated: February 16, 2017 01:28 IST2017-02-16T01:28:29+5:302017-02-16T01:28:29+5:30
नोटबंदीच्या निर्णयाला तीन महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी लोटला. असे असले तरी बँकातील चलन तुटवडा कायमच आहे.

नोटबंदीच्या तीन महिन्यानंतरही बँकांमध्ये चलन तुटवडा कायमच
शेतकऱ्यांची गोची : २४ ऐवजी मिळतात केवळ १० हजार रुपये
समुद्रपूर : नोटबंदीच्या निर्णयाला तीन महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी लोटला. असे असले तरी बँकातील चलन तुटवडा कायमच आहे. शासनाकडून २४ हजार रुपयांचा विड्रॉल देण्याची सुविधा देण्यात आली असली तरी बँकांतून १० हजार रुपयेच दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य व राजकारण्यांचीही गोची झाली आहे.
शहरातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून केवळ १० हजार रुपयांचा विड्रॉल दिला जात आहे. बँक आॅफ इंडियाच्या शाखेतूनही केवळ १० हजार रुपयांचा विड्रॉल दिला जात आहे. यातही सकाळी रांगेत लागल्यानंतर दुपारी हातात केवळ दहा हजार रुपये मिळत आहेत. यामुळे शेतीतील कामे होत नसून अनेकांची मजुरी बुडत असल्याचे दिसते. नोकरदारांना काम सोडून रकमेचा अर्ज करावा लागतो. एकंदरीत शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, दुकानदार, व्यापारी, राजकारणी यांच्यासह सामान्य नागरिक चलन तुटवड्यामुळे वेठीस धरले जात आहेत. शासनाकडून बँकेतून रक्कम काढण्याची मर्यादा समाप्त केल्याचे जाहीर करण्यात आले आहे; पण प्रत्यक्षात केवळ १० हजार रुपयेच मिळत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)