नऊ वर्षानंतर शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण
By Admin | Updated: July 3, 2015 02:36 IST2015-07-03T02:36:39+5:302015-07-03T02:36:39+5:30
राज्य शासनाच्या निर्देशाने रविवारी (४ जुलै) सर्वत्र शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

नऊ वर्षानंतर शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण
साहित्याची बोंब : शिक्षकांसह महसूल विभागाचे कर्मचारी फिरणार गावांत
वर्धा: राज्य शासनाच्या निर्देशाने रविवारी (४ जुलै) सर्वत्र शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यापूर्वी सन २००६ मध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाल्याची नोंद आहे. होणारे सर्वेक्षण तब्बल नऊ वर्षानंतर होणार असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यात येत असल्याचा दिखावा होत आहे.
२० मे २०१५ रोजीच्या आदेशानुसार कार्यक्रम होणार आहे. यात गावासह शहरातील प्रत्येक घरी, प्रत्येक वस्तीत, प्रत्येक तांड्यात जात सर्वेक्षण होणार आहे. यात शाळाबाह्य आढलेल्या मुलाच्या हाताला शाई लावून त्याला शाळेत प्रवेशित करण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे सांण्यात आले आहे. परंतु झालेल्या बैठकीला सरपंचांनी पाठ दिल्याने गावातील सर्वेक्षण अडचणीचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कागदाशिवाय दुसरे साहित्य मिळाले नसल्याची बोंब आहे.
कार्यक्रमाकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत समिती तयार झाली आहे. या समितीत शिक्षण व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तशीच समिती तालुका स्तरावर राहणार असून अध्यक्ष म्हणून तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सचिव म्हणून त्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी काम सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील एकूण ३ हजार २०१ कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. यात जि.प. शिक्षक व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.(प्रतिनिधी)