आग लागल्यानंतर आली पारेषण विभागाला जाग
By Admin | Updated: May 3, 2017 00:43 IST2017-05-03T00:43:09+5:302017-05-03T00:43:09+5:30
नाचणगाव मार्गावरील विद्युत पारेषण कंपनीच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे २४ एप्रिल रोजी आग लागली होती.

आग लागल्यानंतर आली पारेषण विभागाला जाग
कचरा केला साफ : जेसीबीने काढले गवत
पुलगाव : नाचणगाव मार्गावरील विद्युत पारेषण कंपनीच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे २४ एप्रिल रोजी आग लागली होती. विद्युत वितरणचे सहायक अभियंता जी.बी. नाईक यांच्या समयसुचकतेने यात हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे दोन ते तीन तासांत आग विझविली. या घटनेनंतर पारेषणला जाग आली असून गवत कापण्यासह कचरा साफ करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे.
पारेषण कंपनीच्या आवारात पावरग्रीडच्या आसपास पाच ते सात फूट दाट गवत वाढले आहे. या गवताने अचानक पेट घेतला होता. अशी घटना तिसऱ्यांदा याच परिसरात घडली आहे; पण परिसरातील गवत कापण्याचे सौजन्य पारेषण विभागाने दाखविले नाही. आग लागल्यानंतर गवत कापण्यासाठी पारेषण विभागाला जाग आल्याचे दिसून येते.
विद्युत पारेषण कंपनीच्या परिसरात गवत वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाळलेल्या गवताला आग लागण्याचे प्रमाण अधिक असते. २४ एप्रिल रोजी असाच प्रकार घडला. वाळलेल्या गवताने पेट घेतला. आग लागल्यानंतर पारेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. परिसरातील गवत कापून परिसर स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जेसीबीच्या साह्याने गवत कापणीचे काम सुरू आहे. हे काम आधी झाले असते तर आग लागली नसती. घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. नियमित गवत काढले तर भविष्यात अशा घटना घडणार नाही. पारेषण कंपनीतील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)