स्फोटानंतर पोलिसांनी दिला कर्तव्यनिष्ठेचा परिचय

By Admin | Updated: June 4, 2016 01:47 IST2016-06-04T01:47:45+5:302016-06-04T01:47:45+5:30

पुलगाव येथील दारूगोळा भांडारातील त्या स्फोटाने आतील जवानांची होरपळ झाली. यात अनेकांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले.

After the explosion, police gave the introduction of devotion | स्फोटानंतर पोलिसांनी दिला कर्तव्यनिष्ठेचा परिचय

स्फोटानंतर पोलिसांनी दिला कर्तव्यनिष्ठेचा परिचय

आगीवर नियंत्रणासह जखमींच्या उपचाराकरिता धावपळ
वर्धा : पुलगाव येथील दारूगोळा भांडारातील त्या स्फोटाने आतील जवानांची होरपळ झाली. यात अनेकांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले. याची माहिती रात्री १.३० वाजताच्या सुमारास झाली. घटनास्थळ डिफेंसचा भाग असल्याने येथे राज्य पोलिसांना प्रवेश नव्हता; मात्र घटनेप्रती आणि त्यात शहीद झालेल्या जवानांप्रती आपलेही कर्तव्य आहे, असे म्हणत पोलिसांनी दारूगोळा भांडाराबाहेरची सर्व व्यवस्था चोख बजावत कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासह या घटनेत जखमींवर उपचार करण्याकरिता आवश्यक सर्व यंत्रणा तत्परतेने कामाला लागली. जिल्ह्यातील अग्निशमन यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यवतमाळ, अमरावती, बुट्टीबोरी येथील पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देत त्यांच्याकडून मदत मिळविली. दारूगोळा भांडारातील स्थिती भयावह असल्याने येथील यंत्रणा काही काळाकरिता ठप्प झाली होती. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना देत रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांनी दिली.
स्फेटाच्या आवाजाने हादरा बसल्याने आसपासच्या गावातील नागरिकांनी घर सोडून पळण्याचा मार्ग धरला होता. तिथे कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून प्रथम जिल्ह्यातील विशेष पोलीस पथक येथे रवाना करण्यात आले. पुलगाव पोलिसांना दारूगोळा भांडाराच्या मुख्य द्वाराजवळ तैनात करीत परिसरात कोणी जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. घटनेची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचताच त्यांच्याकडून आलेल्या सूचना व येथील परिस्थिती यात सांगड घालण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांनी पार पाडली.
ही सर्व परिस्थिती सांभाळताच बुधवारची सकाळ झाली. घटनेची माहिती वाऱ्यासारची पसरल्याने नागरिकांचे जत्थे पुलगावकडे वळले. शिवाय मंत्र्याचे दौरेही आले. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही आली. दौरे सांभाळणे, मार्ग निश्चित करणे आदी व्यवस्था सांभाळण्याची कसरत आलीच. अशातच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातलगांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही पोलिसांना पार पाडावी लागली. ही सर्व धावपळ सांभाळत शहिदांवर अंत्यसंस्कार करताना झालेली गर्दी, यात कुठलीही हयगय होणार नाही, याची घेण्यात आलेली काळजी पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्यदक्षतेची ओळख ठरली.(प्रतिनिधी)

डीएनएकरिता धावपळ
घटनेतील काही मृतकांची ओळख पटविणे अवघड झाले. यामुळे डीएनए करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याकरिता लागणारे साहित्य सहज उपलब्ध होत नाही. ते साहित्य उपलब्ध करून देण्यासह मृतकांचे व त्यांच्या नातलगांच्या रक्ताचे नमुने डीएनए कीटमध्ये संकलित करुन ते नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागली. यात त्यांची चांगलीच धावपळ झाली.

घटनास्थळी पंचनाम्याची
सर्वात मोठी जबाबदारी
घटनास्थळ संरक्षण यंत्रणेचे असल्याने या घटनेतील मृतदेहांचे पंचनामे व शवविच्छेदन त्यांचीच यंत्रणा करणार असे प्रत्येकाला वाटत होते. मात्र सायंकाळी मृतकांचे पंचनामे करून त्यांचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्याबाबतचे आदेश पोलिसांना आले. याकरिता चमू तयार करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आली. त्यांनी चमू तयार केली व पुलगाव पोलिसांच्या सहायाने पंचनामे करण्यात आले. यात पोलिसांचा रात्र काढावी लागली.

Web Title: After the explosion, police gave the introduction of devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.