अखेर संविधान स्तंभाची दुरूस्ती
By Admin | Updated: November 26, 2015 02:08 IST2015-11-26T02:08:33+5:302015-11-26T02:08:33+5:30
गत काही महिन्यांपासून दुरवस्थेत असलेल्या स्तंभाच्या दुरूस्तीचा मुहूर्त पंचायत समितीला अखेर सापडला. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबरला या स्तंभाची दुरुस्ती करण्यात आली.

अखेर संविधान स्तंभाची दुरूस्ती
संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला डागडुजी
विजय माहुरे सेलू
गत काही महिन्यांपासून दुरवस्थेत असलेल्या स्तंभाच्या दुरूस्तीचा मुहूर्त पंचायत समितीला अखेर सापडला. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबरला या स्तंभाची दुरुस्ती करण्यात आली. नेमका संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला ही दुरुस्ती करण्यात आल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत होते. तसेच ‘लोकमत’ने वारंवार केलेल्या पाठपुराव्यालाही यश मिळाल्याचे बोलल्या जात होते.
सेलू येथील पंचायत समिती आवारातील संविधान स्तंभाची अत्यंत दुरवस्था झाली होती. या संदर्भात ‘लोकमत’ने अनेकवार येथील संविधान स्तंभाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रकाशित केले होते. मंगळवारी पंचायत समितीची मासिक सभा झाली. या सभेत पंचायत समिती सदस्य संजय जयस्वाल व रजनी तेलरांधे यांनी लोकमतमध्ये संविधान स्तंभाच्या दुरावस्थेचे वृत्त प्रकाशित झाले असतानाही आपण त्या स्तंभाची दुरूस्ती केली नाही. गुरूवारी २६ रोजी संविधान दिन आहे. त्यामुळे आपण हा दिवस कसा साजरा करणार, असा मुद्दा उपस्थित करीत एक दिवसात डागडुजी करावी, अशी मागणी केली.
याची दखल घेत बुधवारी २५ ला सकाळपासूनच स्तंभाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. तात्पुरता का होईना पण स्तंभाची दुरूस्ती झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत होते. किरकोळ खर्चासाठी पंचायत समितीला सहा महिन्याहून अधिक काळ का लागला हे न उलगडणारे कोडे असून या स्तंभाच्या दुरूस्तीसाठी एका दिवसातच निधी कसा उपलब्ध झाला, स्तंभाच्या दुरूस्तीसाठी किती खर्च झाला, हे बांधकाम विभागाकडूनच माहिती होणार आहे. याकडेही ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.हा स्तंभ गटविकास अधिकारी कार्यालयापुढे असतानाही दुर्लक्षित झाला होता. स्तंभाच्या दुरूस्तीसाठी अखेर पंचायत समिती सदस्यालाच आवाज उठवावा लागल्याची चर्चा पंचायत समिती आवारात होती.
लोकमतच्या वृत्ताची अखेर दखल
सेलू येथील पंचायत समिती आवारातील संविधान स्तंभाची झालेली दुरवस्था हा येथील नागरिकांसाठी नेहमीच चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय होता. त्यामुळे ‘लोकमत’ने या स्तंभाची दुरुस्ती व्हावी यासाठी वारंवार वृत्त प्रसिद्ध केले. अखेर संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला या स्तंभाच्या दुरुस्तीचा मुहूर्त मिळाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत होते.
किरकोळ खर्चासाठी सहा महिन्यांचा अवधी
किरकोळ खर्चासाठी पंचायत समितीला सहा महिन्यांहून अधिक काळ का लागला हे न उलगडणारे कोडे आहे. या स्तंभाच्या दुरूस्तीसाठी एका दिवसातच निधी कसा उपलब्ध झाला तसेच या स्तंभाच्या दुरूस्तीसाठी किती खर्च झाला, हे बांधकाम विभागाकडूनच माहिती होणार आहे. त्याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.