जलक्रांतीसाठी प्रशासनाने जीव ओतावा
By Admin | Updated: May 6, 2017 00:30 IST2017-05-06T00:30:50+5:302017-05-06T00:30:50+5:30
जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात जनतेमध्ये प्रचंड उत्साह असून लोकसहभागही मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

जलक्रांतीसाठी प्रशासनाने जीव ओतावा
देवेंद्र फडणवीस : जिल्ह्यातील विविध विकासकामांची आढावा बैठक
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात जनतेमध्ये प्रचंड उत्साह असून लोकसहभागही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. या उपक्रमामध्ये प्रशासकीय यंत्रणेने जीव ओतून काम केल्यास सर्वात मोठी जलक्रांती होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आर्वी येथे पंचायत समितीच्या सभागृहात वर्धा जिल्ह्यातील जलयुक्त शिवारसह विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, आ. अमर काळे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री घरकुल योजना, खरीप पीक कर्ज वाटप, स्वच्छ भारत अभियान या योजनेसह लोअर वर्धा प्रकल्पाच्या पूनर्वसनासह विविध योजना आढावा त्यांनी घेतला. वर्धा जिल्ह्याने जलयुक्त योजनेमध्ये उल्लेखनीय काम केले असून येत्या एक महिन्यात अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. स्वच्छ भारत अभियानामध्ये संपूर्ण जिल्हा येत्या तीन महिन्यात हागणदारीमुक्त होईल व या दृष्टीने अंमलबजावणी करावी. ९० टक्केपेक्षा जास्त हागणदारीमुक्त झालेल्या गावांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केल्या.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खते, बियाणे यासह सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल या दृष्टीने नागपूर मॉडेलप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना करताना ते पुढे म्हणाले की, बचत गटासाठी तालुकास्तरावर मॉल तयार करावे तसेच सर्व नगर परिषदांनी शेतकऱ्यांना उत्पादित माल विकत यावा यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच भाजीपाला विक्रीसाठी शासकीय कार्यालय परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
वर्धा मेगा फूड पार्क संदर्भात आढावा घेताना या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन वीज, पाणी व रस्ता या संदर्भातील आवश्यक कामे व मंजूरी एक महिन्यात द्यावी असे सांगताना हा प्रकल्प येथील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलविणारा ठरणार आहे. राष्ट्रीय दूध विकास प्राधिकरणाने वर्ध्यासह १४० गावात दूध संकलनाचे काम करीत आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दुधाचा जास्त दर मिळत असून शेतकऱ्यांनीही दूध उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावे. विदर्भ व मराठवाड्यातील गावांमध्ये एनडीडीबी चांगले काम करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
निम्न वर्धा प्रकल्पाच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना आपले गाव साडून दुसऱ्या ठिकाणी आल्यामुळे आपलेपणाची भावना निर्माण होईल अशाच पद्धतीने पूनर्वसन करावं. यासाठी आदर्श असे मॉडेल तयार करावे. शासनाच्या विविध योजना एकत्रित राबविताना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा निधी जास्तीत जास्त कसा उपयोगात आणता येईल यासाठी प्रयत्न करावे.
वर्धा जिल्ह्याने राबविलेली आपली योजना, वर्धिनीसोबत पूरक वर्धा उपक्रम, लॅन्ड बँक संकल्पना, चारायुक्त शिवार, आदी नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बैठकीत सादर केली. वर्धा ड्रायपोर्ट, सेवाग्राम विकास आराखडा, मागेल त्याला शेततळे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदी उपक्रमाचा आढावाही त्यांनी घेतला.(प्रतिनिधी)