कृषिपंपाला वीज जोडणी नसतानाही आले देयक
By Admin | Updated: October 26, 2014 22:44 IST2014-10-26T22:44:33+5:302014-10-26T22:44:33+5:30
तालुक्यातील येरणगाव येथील विनोद पांडुरंग सुपारे यांनी सहा वर्षांपूर्वी कृषी पंपासाठी वीज जोडणीची मागणी वीज वितरण कपंनीला केली होती. त्यांना अद्याप प्रत्यक्षात वीज जोडणी देण्यात आली नाही;

कृषिपंपाला वीज जोडणी नसतानाही आले देयक
हिंगणघाट : तालुक्यातील येरणगाव येथील विनोद पांडुरंग सुपारे यांनी सहा वर्षांपूर्वी कृषी पंपासाठी वीज जोडणीची मागणी वीज वितरण कपंनीला केली होती. त्यांना अद्याप प्रत्यक्षात वीज जोडणी देण्यात आली नाही; परंतु २०११ पासूनच्या थकबाकीचे देयक मात्र सुपारे यांना पाठविण्यात आले. त्यांची थकबाकी सहा हजार ९१० रुपये असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामुळे सुपारे अवाक् झाले आहेत.
हिंगणघाट उपविभागातील वडनेर वीज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या येरणगाव येथील विनोद सुपारे यांनी ११ डिसेंबर २००८ रोजी कृषी पंपासाठी वीज जोडणीचा अर्ज केला होता. त्यानंतर सुपारे यांनी संबंधित अभियंत्याकडे जोडणी मिळण्यासाठी बरेचदा विनंती केली; परंतु विजपुरवठा झाला नाही. पर्यायाने त्यांना विहिरीत पाणी असून सुद्धा पिकाचे ओलित करता आले नाही. त्यामुळे त्यांचे दरवर्षीच्या हंगामात उत्पन्न कमी होवून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अशास्थितीत त्यांना वीज वितरण कंपनीकडून थकीत बिलाचे त्वरीत भरणा करण्याचे माणगीपत्र मिळाल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी त्वरीत वडनेर येथे जावून अभियत्यांची भेट घेतली असता २०११ पासून कनेक्शन कागदोपत्री देण्यात आल्याची माहिती मिळाली. परंतु प्रत्यक्षात मात्र विहिरीवरील मोटार पंपाला वीज पुरवठा नाही. त्यामुळे तीन वर्षात झालेल्या आर्थिक नुकसानीला वीज वितरण कंपनीला जबाबदार ठरवून नुकसान भरपाईची व विजपुरवठा न करता दिलेले थकबाकीचे बोगस देयक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी वीजवितरण कंपनीला प्रत्यक्षात वीज जोडणी त्वरीत करण्याची मागणी सुद्धा केली आहे. यासंदर्भात त्वरीत न्याय न मिळाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे सदर शेतकऱ्याची मनस्थिती ढासळत असून विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)