शेतकऱ्यांवर निसर्गाचा घाला
By Admin | Updated: July 12, 2014 23:49 IST2014-07-12T23:49:00+5:302014-07-12T23:49:00+5:30
पावसाळा सुरू होऊन महिना लोटला. मात्र वर्धा जिल्ह्यात पावसाचा पत्ताच नव्हता. शेतातील बियाणे जागीच कुजत असल्यामुळे आता त्याला अंकूर फुटण्याची आशा मावळली आहे. यामुळे आता हे वर्ष कसे जाणार

शेतकऱ्यांवर निसर्गाचा घाला
जिल्ह्यात वरुणराजाच्या वाकुल्या : कृषी विभागाचेही आकाशाकडे डोळे, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
राजेश भोजेकर - वर्धा
पावसाळा सुरू होऊन महिना लोटला. मात्र वर्धा जिल्ह्यात पावसाचा पत्ताच नव्हता. शेतातील बियाणे जागीच कुजत असल्यामुळे आता त्याला अंकूर फुटण्याची आशा मावळली आहे. यामुळे आता हे वर्ष कसे जाणार या चिंतेने शेतकऱ्यांच्या डोळ्या अश्रू तरळत आहे. शुक्रवारी वरुणराजाने हजेरी लावून वाकुल्या दाखविल्या. कृषी विभागाही हात हलवत आहे. शेतकऱ्यांसह हा विभागही आकाशाकडे डोळे लावून आहे.
मागील पाच वर्षांपासून वरुणराजाची जिल्ह्यावर अवकृपा होत आहे. कधी कोरडा तर ओल्या दृष्काळाची स्थिती जिल्ह्यात निर्माण होत आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे शेती पिकत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभरातील आर्थिक बजेटच कोलमडून पडत आहे. मागील वर्षी जून व जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. सतत महिनाभर पाऊसाने साथ सोडली नव्हती. नदी नाले दुथडी वाहत होते. इतकेच नव्हे, तर आर्वी, आष्टी, वर्धा, देवळी, सेलू, हिंगणघाट, समुद्रपूरसह कारंजा तालुक्यातही पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत केले होते. हिंगणघाट तालुक्यात एकाच दिवशी सर्वाधिक १८८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. काही भागात १५० मि.मी.वर पावसाची नोंद झाली होती. पावसाचा हा विक्रम यावर्षी होणार नाही पण पाऊस येणारच नाही, असा अंदाज कृषी विभागालाही नव्हता. यामुळे यंदा पावसामुळे नव्हे, तर पावसाअभावी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत व्हायला सुरूवात झाली आहे. मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी हिरवे स्वप्न बघितले होते. त्या अनुषंगाने अवाढव्य खर्च करुन शेत जमीन सुपीक करुन ठेवली आणि पावसाची वाट बघायला सुरूवात केली. आज ना उद्या पाऊस येईल, अशी आशा शेतकरी बांधव बाळगून होता. मात्र वरुणराजाने या आशेवरच पाणी फेरले. पावसाळ्याला सुरूवात होऊन महिना लोटला आहे. मात्र एका थेंबाचाही पत्ता नाही. जिल्ह्यात ४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड केली जाते. यापैकी १० टक्के क्षेत्र म्हणजेच केवळ ४२ हजार हेक्टर ओलिताखाली असल्याची कृषी विभागाची माहिती आहे, तर ९० टक्के म्हणजेच ३ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्र हे कोरडवाहू आहे. या क्षेत्रात पाऊस आला नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडतात. पर्यायाने या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळतात. पेरणीची तयारी म्हणून या शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे बियाणे आणि रासायनिक खते खरेदी केले. हा खर्च पूर्णत: शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला. आता पाऊस आला तरी नुकसान अटळ आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे. ते कसेबसे पिके जगविण्याचा खटाटोप करीत आहे. मात्र नदी-नाले आणि जिल्ह्यातील प्रकल्पच कोरडे पडत असल्यामुळे ओलिताची सोयही आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागानेही हात वर केल्यामुळे आता वरुणराजाच तारु शकतो, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांपुढे आहे.
कापूस व सोयाबीन पिके धोका देण्याची शक्यता
यंदाचा पावसाळा ऋतु विचित्र आहे. मागील ४० वर्षांत पहिल्यांदाच पावसाने शेतकऱ्यांना पेरणीच करु दिली नाही. ज्यांनी पेरणी केली. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणीही साधण्याची शक्यता कमीच आहे. साधली तरी त्याचा उत्पन्नावर बिकट परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. यावर्षी कापूस आणि सोयाबीन पिके शेतकऱ्यांना साथ देईल, याची जराही शाश्वती राहिलेली नाही. या पिकाच्या मागे शेतकरी लागून राहिला तर मोठे आर्थिक संकट त्याच्यापुढे येण्याची दाट शक्यता आहे.
पर्यायी पीक म्हणून तुर, ज्वारी व मका लागवड फायद्याची - कृषी अभ्यासक
कापूस आणि सोयाबीनचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्यात जमा आहे. अशावेळी शेती पिकविणे कठिण झाले आहे. बाजारात चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे उपलब्ध नाही. यात शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी या पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा ज्वारी, मका व तुरीचे पीक घेतल्यास ते शेतकऱ्यांचा यंदाचा हंगाम पुढे नेण्यास मदत करेल.
शासनाकडून अपेक्षा
महागाई आणि शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना ज्वारी, मका आणि तुरीची बियाणे आणि खते उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. तसेच पेरणी व कापणीची कामे रोहयोतून केल्यास मजुरांनाही रोजगार मिळेल आणि संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा खर्चही वाचेल. यामुळे शेतीची नापिकी होणार नाही. मजुरांना रोजगार मिळेल आणि जनावरांना चाराही उपलब्ध होईल, असेही कृषी अभ्यासकांचे म्हणणे आहे. या दृष्टीने कृषी विभागाने पावले उचलण्याची गरज आहे. मात्र हा विभागही आपल्या हाती काहीच म्हणत हातावर हात ठेवून बसला आहे.