व्यसने, वाढती चरबी व व्यायामाचा अभाव घातक
By Admin | Updated: October 6, 2015 02:51 IST2015-10-06T02:51:00+5:302015-10-06T02:51:00+5:30
बदलत्या जीवनशैलीत ताणतणाव वाढत आहेत. तंबाखुजन्य पदार्थ हृदयावर आघात करीत आहेत. बाहेरील

व्यसने, वाढती चरबी व व्यायामाचा अभाव घातक
वर्धा : बदलत्या जीवनशैलीत ताणतणाव वाढत आहेत. तंबाखुजन्य पदार्थ हृदयावर आघात करीत आहेत. बाहेरील खाद्यपदार्थांमुळे तसेच दैनंदिन व्यायामापासून आपण दुरावल्यामुळे शरीरातील चरबी वाढत आहे. या सर्वांचा दुष्पपरिणाम म्हणजे भारत हृदयविकाराबाबत जगात पहिल्या स्थानावर पोहचला आहे. भविष्यातील धोका ओळखून हृदयरोगाला वेळीच आळा घाला, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठातील हृदयरोग विभागप्रमुख डॉ. सतीश खडसे यांनी केले.
राधिकाबाई मेघे स्मृती परिचारिका महाविद्यालय व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हिप्पोक्रेटस सभागृहात आयोजित हृदयविकार जानजागृती कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते बोलता होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे तार अतिथी म्हणून सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. सी. गोयल, नर्सिंग समन्वयक मनीषा मेघे, सिस्टर टेस्सी सेबास्टीयन, परिचारिका, प्राचार्य भालचंद्र कुळकर्णी, प्राचार्य बेबी गोयल, प्राचार्य वैशाली ताकसांडे, हृदयरोग भौतिकोपचारतज्ज्ञ डॉ. सोनम दफ्तरी, आहारतज्ज्ञ निहारिका दिवाण, सहायक अधिपरिचारिका वैशाली टेंभरे उपस्थित होते.
हृदयविकारांवर आळा घालण्यासाठी उपाययोजनांकडे लक्ष वेधताना डॉ. खडसे म्हणाले, हृदयरोग जसा आनुवांशिकतेतून येतो तसाच तो आपण स्वत: आपल्या कृतीने ओढवून घेतो. पूर्वी मुलेमुली भरपूर खेळत असत. पण आता ते सतत कम्प्युटर आणि टीव्हीसमोर असतात. सायकल चालविण्यामुळेही पूर्वी व्यायाम व्हायचा. आता शेजारी जाण्यासाठीही बाईक हवी असते. पूर्वी शाळेत जाताना घरी तयार केलेला भाजीपोळीचा डबा सोबत असायचा. आता कृत्रिम चायनिज आणि जंक फूड आम्हाला लंचब्रेकमध्ये हवे असते. तंबाखूच्या वापरातून ८५० प्रकारची रसायने शरीरात शिरकाव करून हृदयावर आघात करीत आहेत. हे सर्व टाळायचे असेल तर चरबी न वाढविणारा घरगुती आहार, दैनंदिन योगासने, किमान अर्धा तास रोज चालणे आणि व्यसनांपासून दूर राहणे, हाच मार्ग आहे, असे मत डॉ. खडसे यांनी मांडले.
निहारिका दिवाण यांनी योग्य आहाराबाबत माहिती दिली. तयार मसाले, वेफर्स, चिप्स, कृत्रिम शीतपेये हे सर्व हृदयाचे शत्रु आहेत. तेलकट, पदार्थाचे अतिसेवनही घातक आहे. आहारात तेल वापरायचेच असेल तर जवस, तीळ, सोयाबीन, धानतेल असे वैविध्यपूर्ण असले पाहिजे. मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळावे तसेच मीठ, साखरेचे प्रमाण आहारातून कमी करावे. गहू, मोड आलेले कडधान्य, मुगडाळीची खिचडी, हिरव्या पालेभाज्या यांचा वापर रोजच्या आहारात असावा, असे दिवाण यांनी सांगितले. डॉ. सोनम दफ्तरी यांनी ही व्यायामावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शीतल साखरकर यांनी केले. आभार आरती राऊत हिने मानले.(शहर प्रतिनिधी)