लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील देऊरवाडा येथील अवैध वाळू उत्खनन आमदार दादाराव केचे यांनी चव्हाट्यावर आणले होते. हा प्रश्न आता थेट विधान परिषदेत गाजला. यावर उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तलाठ्यांसह मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता या दोन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.
देऊरवाडा येथील वाळू घाटातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांनी आमदार दादाराव केचे यांना दिली होती. त्या माहितीच्या आधारे आमदार केचे यांनी २६ एप्रिल २०२५ रोजी देऊरवाडा येथील घाटावर जाऊन वाळू चोरीचा भंडाफोड केला होता. तेव्हाच त्यांनी जिल्हाधिकारी व महसूलमंत्र्यांना फोन करून माहिती दिली होती. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. मंगेश क्षीरसागर यांच्या शेताजवळ वाळूचा मोठा ढीग आणि सेक्शन पंप, मशीन, स्वयंपाकाचे साहित्य व सोफासेट असे साहित्य आढळून आले होते. याप्रकरणी कारवाई करून वाळू जप्त करण्यात आली होती. ही वाळू घरकुल लाभार्थ्यांना द्यावी, अशी मागणी असतानाही प्रशासनाकडून थातूरमातूर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रकार केला होता. परिणामी आमदार दादाराव केचे यांनी विधानपरिषेत प्रश्न उपस्थित करून याकडे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधितांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले तसेच अटकही केल्याची माहिती दिली. याशिवाय जे काम महसूल अधिकाऱ्यांचे होते ते काम आमदारांनी केले. वाळूचा काळाबाजार उघडकीस आणला, त्यामुळे संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबित केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे.