विलगीकरणासाठी शहरातील अठरा शाळा अधिग्रहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:07+5:30
कोविड-१९ साथरोग प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत बाहेर राज्यातील, जिल्ह्यातील लोकांना विलगीकरण करुन सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. आता त्यांना त्यांच्या मुळ गावी पोहोचविण्याचे काम सुरु आहे.आता आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यात अडकून पडल्याने ते आता गावाकडे येत आहे.

विलगीकरणासाठी शहरातील अठरा शाळा अधिग्रहित
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून तसेच कोरोनग्रस्त भागातून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत साडेआठ हजारावर व्यक्ती शहरात आले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे प्रमाण आणखी वाढणार असून ज्यांना घरी विलगीकरणात राहणे शक्य होणार नाही, अशांकरिता प्रशासनाकडून शहरातील १८ शाळा, महाविद्यालये अधिग्रहित केले असून शाळा व्यवस्थापनाने तेथे व्यवस्था करुन देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिले आहे.
कोविड-१९ साथरोग प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत बाहेर राज्यातील, जिल्ह्यातील लोकांना विलगीकरण करुन सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. आता त्यांना त्यांच्या मुळ गावी पोहोचविण्याचे काम सुरु आहे.आता आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यात अडकून पडल्याने ते आता गावाकडे येत आहे. यापुढेही ते येणार असल्याने गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मार्फत माहिती प्राप्त करुन त्यांना १४ दिवसाकरिता गृह विलगीकरणामध्ये ठेवले जात आहे. पण, काहींची घरे लहान असल्यामुळे तेथे आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असतो किंवा घरातील इतर व्यक्तीची अडचण होते. त्यामुळे अशा व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करणे सर्वांच्याच दृष्टीने सोयीचे असल्याने गावातील, शहरातील शाळा, महाविद्यालये अधिग्रहित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
वर्ग खोल्यांमधील फर्निचर इतरत्र ठेवून आवश्यकतेनुसार वर्ग खोल्या खाली करुन द्याव्या तसेच वीज, पंखे, पाणी, स्वच्छता व सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याच्या सूचना अधिग्रहित केलेल्या शाळा, महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना दिल्या आहे.
नागठाणा येथील अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय आधीच अधिग्रहित करण्यात आले आहे. आता आणखी १७ असे एकूण १८ शाळा व महाविद्यालये अधिग्रहित केले आहे.