बंगळुरु येथे अटक : आरोपींची संख्या पडद्याआडवर्धा : सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून महिन्यात दुहेरी हत्याकांड उघड झाले होते. या प्रकरणातील आरोपींचा सर्वत्र शोध घेतला असता त्याचा कुठेही पत्ता लागत नव्हता. असे असतानाही पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा पिच्छा पुरविणे सुरूच ठेवले. यात अखेर यातील आरोपी बंगळुरु येथून ताब्यात घेतले असून या आरोपींनी घेवून ते शनिवारी सकाळपर्यंत वर्धेत येतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. सेवाग्राम ठाण्याच्या हद्दीतील मंगला वरठी या महिलेच्या निर्घृण हत्येच्या तपासात संपूर्ण यंत्रणा गुंतली असताना सेवाग्राम पोलिसांचा संशय योग्य निघाला. पोलिसांची चमू साऱ्यांच्या नजरा चुकवीत बंगलोरला पोहोचली. तिथून एका गावातून कुटकी येथील हत्या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांना घेऊन पोलिसांची चमू परतीच्या प्रवासावर निघाली आहे. या चमूमध्ये तपासाकरिता असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे, जमादार बिसणे, जमादार पंचशीला कांबळे यांच्यासह इतर काहींचा समावेश आहे. जून महिन्यांपूर्वी कुटकी शिवारात महिला व पुरूषाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शेतात पुरलेल्या अवस्थेत आढळून आले होते. सदर हत्याकांड अंबानगर येथील पारधी बेड्यावर झाल्याचा पोलिसांचा संशय होता. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात ठाणेदार पराग पोटे यांनी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. तपासाला प्रारंभ करण्यात आला तेव्हा पारधी बेड्यावरील पारधी पळून गेले. त्यांचा कोणताच ठावठिकाणा लागत नव्हता. ठाणेदार पराग पोटे यांनी या तपासाला न थांबविता तो सुरूच ठेवल्यामुळे या गुन्ह्याची लिंक चक्क बंगलोरपर्यंत लागली. पोलिसांची चमू बंगलोर येथे डेरेदाखल झाली व त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्या आरोपींना घेऊन पोलिसांची चमू वर्धेकरिता रवाना झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.(प्रतिनिधी)
कुटकी येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी गवसले
By admin | Updated: August 22, 2015 02:13 IST