लोंबकळत्या तारांमुळे अपघाताचा धोका
By Admin | Updated: July 13, 2015 02:16 IST2015-07-13T02:16:36+5:302015-07-13T02:16:36+5:30
सिंदी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत तराळे ले-आऊट येथील विद्युत खांबावरील तारा अनेक दिवसांपासून लोंबकळत आहेत.

लोंबकळत्या तारांमुळे अपघाताचा धोका
दुरूस्तीकडे कानाडोळा : तीन वेळा तक्रार देऊनही दखल नाही
वर्धा : सिंदी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत तराळे ले-आऊट येथील विद्युत खांबावरील तारा अनेक दिवसांपासून लोंबकळत आहेत. या तारांमधून जिवंत प्रवाह असल्याने याचा स्पर्श नागरिकांना झाल्यास अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. येथील नागरिकांनी विद्युत वितरण विभागाला लेखी अर्ज व तक्रारी दिल्यात. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.
तराळे ले-आऊट येथील वॉर्ड क्रमांक ५ येथील इलेक्ट्रीक सिंगल फेज लाईनच्या तारा जमिनीपर्यंत झुकल्या आहेत. या तारांचा रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना स्पर्श होऊ शकतो. या तारातून विद्युत प्रवाह सुरू असल्याने जीवित हानीचा धोका अटळ आहे. घराचे बांधकाम करताना सुभाष बोर्डेवार यांनी कनिष्ठ अभियंता यांच्याकडे चार वेळा लेखी अर्ज केले. मात्र या अर्जाची अद्याप दखल घेण्यात आली नाही. परिणामी त्यांना घराचे बांधकाम करण्यात व्यत्यय येत आहे. वादळवाऱ्यांमुळे या तारा लोंबकळत आहे. विद्युत खांबापासून तन्यता देत तारा पुर्ववत करणे गरजेचे होते. कर्मचाऱ्यांच्या वेळकाढुपणाचा फटका रहिवाश्यांना सहन करावा लागत आहे. तक्रार आणि लेखी अर्ज देवूनही दखल घेण्यात येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)