लोंबकळत्या वीज तारांमुळे अपघाताचा धोका

By Admin | Updated: May 16, 2016 02:23 IST2016-05-16T02:23:32+5:302016-05-16T02:23:32+5:30

दिघी (होणाडे) येथील विद्युत खांबावरील तारा अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या आहेत. सहज हात पूरेल एवढ्या खाली आलेल्या ...

Accidental hazard due to lukewarm electricity | लोंबकळत्या वीज तारांमुळे अपघाताचा धोका

लोंबकळत्या वीज तारांमुळे अपघाताचा धोका

महावितरण कार्यवाही करणार काय ? : दिघी येथील सरपंचासह शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
रोहणा : दिघी (होणाडे) येथील विद्युत खांबावरील तारा अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या आहेत. सहज हात पूरेल एवढ्या खाली आलेल्या या वीज तारांमुळे अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरपंच सुनीता गजानन सयाम यांनी येथील वीज कार्यालयात एक वर्षापूर्वी ग्रा.पं. चा ठराव, लेखी निवेदन प्रत्यक्ष भेट घेत सादर केले. वीज तारा ताणण्याची मागणी केली; पण कार्यवाही झाली नाही. यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महावितरण कार्यवाही करणार काय, असा प्रश्न सरपंच व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दिघी (होणाडे) येथे विद्युत वितरण कंपनीद्वारे टाकण्यात आलेल्या विद्युत लाईनमध्ये दोन खांबांमध्ये अधिक अंतर ठेवण्यात आले आहे. यात खांबांची संख्या कमी केल्याने गावात अनेक ठिकाणी वीज तारा लोंबकळत असून त्या खाली आल्या आहेत. ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक शाळेच्या परिसरातील तारा सहज हात पूरेल एवढ्या अंतरावर आल्या आहेत. तेथील रस्त्यावरून उंच वाहन, भरतीची बैलबंडी वा माल भरालेला ट्रक वा ट्रॅक्टर नेताना विजेच्या जिवंत तारांना स्पर्श होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वीज तारांची हिच अवस्था गावात अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. सध्या अवकाळी पाऊस, वादळ व सोसाट्याचा वारा येण्याचे दिवस आहेत. अशावेळी लोंबकळत्या तारांचे एकमेकांना घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या पडतात. एवढेच नव्हे तर तारा तुटण्याचीही भीती असते.
१५ दिवसांपूर्वी सोसाट्याचा वारा आला होता. यात गावाजवळील तुकारामजी निवल यांच्या शेतातील तारांचे घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने त्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे पाईप जळून नुकसान झाले. याबाबत रोहणा येथील वीज कार्यालयात तक्रार नोंदविण्यात आली. धोका लक्षात घेत सरपंच सयाम यांनी किमान शाळेजवळ अधिकचा खांब देण्याची मागणी केली होती. यासाठी एक वर्षापूर्वी ग्रा.पं. चा ठराव विद्युत कार्यालयात सादर केला. तेव्हापासून ग्रा.पं. प्रशासन सातत्याने कधी लेखी निवेदनाद्वारे तर कधी प्रत्यक्ष भेटीद्वारे समस्येची जाणीव महावितरणच्या अधिकाऱ्यांना करून देत आहे; पण सदर समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक कृती केली जात नसल्याचेच दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी दिघी परिसरात नवीन रोहित्रापासून तारा टाकण्यात आल्या. त्या ताराही ताणून जोडणे अपेक्षित असताना लुज जोडणी केली. यामुळे त्या लोंबकळत आहे. यावरून महावितरण प्रशासन दिघी येथील ग्रामस्थांच्या समस्यांबाबत उदासिन आणि बेजबाबदार असल्याचेच दिसून येते. अधिक चौकशी केली असता ही सर्व कामे खासगी कंत्राटदारामार्फत केली जातात. त्यावर कंपनी प्रशासनाचे नियंत्रण असते; पण योग्य नियंत्रणाअभावी कंत्राटदार थातूरमातूर काम करून सामान्यांच्या जीविताला धोका निर्माण करतात.
नजीकच्या वारा, वादळ व पावसाचा काळ लक्षात घेता दिघी येथील तारा ताणून शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एक खांब द्यावा. तारा ताणण्याचे काम त्वरित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)

वर्षभरापासूनही कार्यवाहीला बगल
दिघी होणाडे येथे कित्येक दिवसांपासून वीज तारा लोंबकळत आहे. याबाबत मागील वर्षी सरपंचांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रा.पं. चा ठराव व निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली होती; पण एक वर्ष लोटूनही कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, यावर्षीही अपघाताचा धोका कायम आहे. वीज कंपनीचे अभियंते कार्यवाहीला बगल देत असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.

Web Title: Accidental hazard due to lukewarm electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.