कापूस वाहून नेणाऱ्या गाडीला अपघात; शेतकरी ठार
By Admin | Updated: February 22, 2015 01:48 IST2015-02-22T01:48:38+5:302015-02-22T01:48:38+5:30
मालवाहू गाडीमध्ये कापूस घेवून विक्रीकरिता हिंगणघाटला जात असतांना वाहनाला अपघात झाला. यात पिंपळगाव येथील शेतकरी भास्कर शंकर हिवरे (५५) यांचा मृत्यू झाला.

कापूस वाहून नेणाऱ्या गाडीला अपघात; शेतकरी ठार
समुद्रपूर : मालवाहू गाडीमध्ये कापूस घेवून विक्रीकरिता हिंगणघाटला जात असतांना वाहनाला अपघात झाला. यात पिंपळगाव येथील शेतकरी भास्कर शंकर हिवरे (५५) यांचा मृत्यू झाला. सदर घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जाम येथील पी.व्ही. टेक्सटाईल्स समोर घडली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन मधुकर मोहर्ले रा. धोतरा हा त्याच्या मालकीची मालवाहू गाडी क्र. एमएच ३२ क्यु ४५८२ मध्ये गिरड जवळील पिंपळगाव येथील भास्कर हिवरे यांच्या मालकीचा कापूस भरून हिंगणघाट येथे विक्रीला नेत होता. दरम्यान जाम नजीकच्या पी.व्ही. टेक्सटाईल्स जवळच्या वळणावर रस्त्याच्या बाजुला असलेल्या रेलींगला गाडी घासत गेल्याने शेतकऱ्याचा हात शरीरावेगळा झाला तर पुढे जावून गाडी उलटली. भास्कर हिवरे गाडीखाली दबल्या गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व वाहतूक पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून शेतकऱ्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत. काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली.(तालुका प्रतिनिधी)