महात्मांचे तत्त्व पाळण्यापेक्षा अंगिकारणे फायद्याचे!
By Admin | Updated: September 18, 2014 23:38 IST2014-09-18T23:38:56+5:302014-09-18T23:38:56+5:30
महात्मा गांधी यांनी सुखकर आणि सोपे जीवन जगण्याची अनेक तत्त्वे दिली आहेत. तत्त्वे पाळण्यापेक्षा ती आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या तत्त्वाचा आम्ही अंगिकार केल्याने आमचे जीवन सुकर झाले आहे.

महात्मांचे तत्त्व पाळण्यापेक्षा अंगिकारणे फायद्याचे!
सेवाग्राम : महात्मा गांधी यांनी सुखकर आणि सोपे जीवन जगण्याची अनेक तत्त्वे दिली आहेत. तत्त्वे पाळण्यापेक्षा ती आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या तत्त्वाचा आम्ही अंगिकार केल्याने आमचे जीवन सुकर झाले आहे. आजच्या धकाधकीच्या व गतीमान झालेल्या जीवनात त्यांची तत्त्वे महत्त्वाची ठरतात, असे विचार राष्ट्रपिता महत्मा गांधी यांची नात ताराबहन भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. सेवाग्राम आश्रमला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत बापुंच्या वास्तू व त्यांच्या वापरातील वस्तूंची पाहणी करून आश्रमवासियांशी मुक्त संवाद साधला.
ताराबहन ९० वर्षांच्या असून बापुंचे धाकटे पुत्र देवदास यांची मुलगी आहे. सध्या त्यांचे वास्तव्य दिल्ली येथे आहे. आश्रमात आल्यानंतर अध्यक्ष जयवंत मठकर तसेच साधक व कार्यकर्त्यांनी सूतमाळ तथा खादीची शाल देवून त्यांचे स्वागत केले. आदी निवास, बा व बापू कुटी, आखरी निवास तसेच त्यांच्या मोठ्या आई व वडील रामदास तसेच निर्मला गांधी यांच्या निवासस्थानाचीही पाहणी केली. वास्तुंच्या ठिकाणाचे फलकमात्र आवर्जून वाचले.
आश्रमवासी आणि कार्यकर्त्यांशी बोलतांना फलकावरील सूचनांचे आमच्या घरात पालन होत होते. बापूंना आम्ही खूप घाबरायचो, तर मोटी बा (कस्तुरबा) मात्र खूप प्रेमळ होत्या. बारीक सारीक गोष्टींकडे बापुंचे लक्ष असायचे. सामान्यपणे आमची कामे आम्ही लहानपणापासून करीत आलो. त्यामुळे कामाचा, श्रमचा कमीपणा वाटला नाही. पागल दौड फलकाबाबत त्या म्हणाल्या बापूंनी त्यावेळी हे सांगितले पण आजचा विचार केला तर खऱ्या अर्थानी आजच त्याची गरज असल्याचे प्रकर्षाने वाटते. बापुंचा आश्रम चांगल्याप्रकारे सांभाळत असल्याबद्दन आनंद व्यक्त केला. परिचय व माहिती जयवंत मठकर यांनी दिली. यावेळी अशोक गिरी, बाबाराव खैरकर, नामदेव ढोक, प्रभाकर आत्राम, सिध्देश्वर, शेरखॉँ पठान, प्रशांत, हिराभाई, ललीता, शोभा, वैशाली आत्राम, प्रभा, अश्विनी, जयश्री पाटील, माया ताकसांडे यांच्यासह आश्रमप्रतिष्ठाणचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)