फरार उपनिरीक्षकाला बडनेऱ्यात बेड्या

By Admin | Updated: June 27, 2015 02:43 IST2015-06-27T02:43:43+5:302015-06-27T02:43:43+5:30

बोर व्याघ्र प्रकल्पात मित्रासह गेलेल्या युवतीचा विनयभंग करून पसार झालेला सेलू पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी याला अखेर वर्धा पोलिसांनी बडनेरा जि. अमरावती येथून अटक केली.

The absconding sub-inspector bands in Badnera | फरार उपनिरीक्षकाला बडनेऱ्यात बेड्या

फरार उपनिरीक्षकाला बडनेऱ्यात बेड्या

बोर येथील विनयभंग प्रकरण: पळण्याच्या प्रयत्नात उडी घेतल्याने जखमी
सेलू : बोर व्याघ्र प्रकल्पात मित्रासह गेलेल्या युवतीचा विनयभंग करून पसार झालेला सेलू पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी याला अखेर वर्धा पोलिसांनी बडनेरा जि. अमरावती येथून अटक केली. पोलीस येत असल्याची माहिती मिळताच त्याने पळण्याकरिता घराच्या चवथ्या माळ्यावरून उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
एका आदिवासी समाजाच्या युवतीचा विनयभंग केल्याचा गुन्हा राजू चौधरी याच्याविरुद्ध सेलू ठाण्यात दाखल आहे. यात त्याला वाहन चालक निलेश मेश्राम याचे सहकार्य होते. या प्रकरणात सेलू ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. मात्र तेथे उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अटकेची कारवाई न केल्यामुळे शनिवारी रात्री त्याने पळ काढला. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना कुठलाही थांगपत्ता लागला नाही. या उपनिरीक्षकाला पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच पळविल्याचा आरोप सुरू झाला. यामुळे संतापलेल्या काही आदिवासी संघटनांनी कारवाई संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही सादर केले होते. यामुळे प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळत होते. पोलीस ठाण्यातून पसार झालेल्या या उपनिरीक्षकाच्या शोधात पोलीस असताना तो बडनेरा येथील हरिशांती अपार्टमेंटमधील त्याच्या मित्राच्या मालकीच्या घरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात चवथ्या माळ्यावरुन उडी घेतली. यात त्याचा पाय मोडल्याचे समजते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
पोलिसांच्या तपासाकडे जनतेचे लक्ष
फरार राजू चौधरी याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याची चौकशी पोलिसांकडून सुरू झाली आहे. यात त्याने आतापर्यंत त्याने किती युवतींचा विनयभंग केला वा बलात्कार. किती मोबाईल चोरले वा जप्त केले याचा तपास पोलीस पोलिसांपुढे आव्हान आहे. आरोपींचे कारनामे बोर परिसरात चर्चिले जात असून तपासात किती पुढे येते, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: The absconding sub-inspector bands in Badnera