वर्धा जिल्ह्यात तब्बल चौदा तुकड्यांत आढळला वाघाचा कुजलेला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 18:31 IST2022-08-12T18:30:58+5:302022-08-12T18:31:34+5:30
Wardha News समुद्रपूर तालुक्यातील कोरा नजीकच्या मौजा पवनगाव झुडपी जंगल परिसरात तब्बल चौदा तुकड्यांत वाघाचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

वर्धा जिल्ह्यात तब्बल चौदा तुकड्यांत आढळला वाघाचा कुजलेला मृतदेह
महेश सायखेडे
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील कोरा नजीकच्या मौजा पवनगाव झुडपी जंगल परिसरात तब्बल चौदा तुकड्यांत वाघाचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून शासकीय नियमानुसार वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.
मौजा पवनगाव भागातील झुडपी जंगल परिसरात कुजल्यागत दुर्गंधी येत असल्याने काही नागरिकांनी बारकाईने पाहणी केली. त्यावेळी वाघ सदृष्य वन्यप्राण्याच्या मासाचे तुटडे आढळून आले. त्यानंतर तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता संबंधित मासाचे तुकडे वाघाचे असल्याचे पुढे आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कुजलेले व विखुरलेले वाघाच्या मासाचे तब्बल १४ तुकडे एकत्र करून पंचनामा आणि शवविच्छेदनाअंती मासाच्या तुकड्यांची शासकीय नियमानुसार विल्हेवाट लावली. यावेळी डॉ. मेघा बनकर, डॉ. सुशील पांडव, डॉ. सचिन खेमलापुरे, समुद्रपूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. व्ही. बोरकर, ए. एस. निनावे, वन्यजीव प्रेमी कौस्तूब गावंडे, मानद वन्यजीव संरक्षक संजय इंगळे तिगावकर आदींची उपस्थिती होती.
शिकारीचा अंदाज?
तब्बल १४ तुकड्यांत वाघाचा कुजलेला मृतदेह मिळाल्या प्रकरणी वनविभागाने नोंद घेतली आहे. सहा ते सात दिवसांपूर्वी वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात असून मृत वन्यजीव वाघ की वाघिण हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शिवाय मृत वाघाच्या पायाची नखे दिसून आली नाही. तर तोंडाचा मिशीचा भाग जबडयासहीत कापलेल्या अवस्थेत दिसून आल्याने नक्कीच ही शिकार असावी असा अंदाज बाळगून वनविभागाचे अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत.
नागपूर विभाग ॲक्शन मोडवर
समुद्रपूर तालुक्यातील ज्या परिसरात वाघाचा मृतदेह तुकड्यांत आणि कुजलेल्या अवस्थेत आढळला त्या परिसरापासून चंद्रपूर जिल्ह्याची सीमा अवघ्या काही अंतरावर आहे. शिवाय ही शिकार असावी असा अंदाज वनविभागाला असून वनविभागाचा नागपूर विभाग आता ॲक्शनमोडवर आला असून लवकरच या घटनेतील रहस्य उलगडण्यात येईल, अशा विश्वास वनविभागाच्या वतीने वर्तविला जात आहे.