लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ४ लाख ३० हजार ५० हेक्टरवर सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची लागवड होणार असून त्यासाठी एकूण ९७ हजार ४० क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सध्या बियाण्यांची आवक सुरू झाली असून शेतकरीही उन्हाळवाहीसह बियाणे खरेदीसाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुवळ करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सन २०२१-२२ खरीप हंगामात ४ लाख ३० हजार ५० हेक्टरपैकी २ लाख २७ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, १ लाख २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन, ७३ हजार ५५० हेक्टरवर तूर, २ हजार १५ हेक्टरवर ज्वारी, १ हजार ८३५ हेक्टरवर मका, ७१० हेक्टरवर उडीद, ४८५ हेक्टरवर मूग तसेच ६७५ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासाठी एकूण ९७ हजार ४० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून सोयाबीन, तूर तसेच कपाशीचे बियाणे काही प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. तर उर्वरित बियाणे वेळीच वर्धा जिल्ह्यात कसे दाखल होईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यंदा कुठल्याही परिस्थितीत बियाण्यांची टंचाई होणार नाही असे नियोजन करण्यात आले असले तरी ३० मे रोजी संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
मध्यप्रदेशातील सोयाबीन बियाणे येणार वर्धेत- मागील वर्षी मध्यप्रदेश शासनाने महाराष्ट्राला बियाणे देण्यावर बंदी घातली होती. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र शासनाने राज्याला बियाणे मिळावे यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर सध्या महाराष्ट्राला सोयाबीन बियाणे देण्यास मध्यप्रदेश शासनाने होकार दर्शविला आहे. त्यामुळे यंदा वर्धा जिल्ह्यात मध्यप्रदेशातील सोयाबीन बियाणे दाखल होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.
कठोर निर्बंधांमुळे कृषी केंद्र आहेत बंद- झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शहरी व ग्रामीण भागातील कृषी केंद्र बंद आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील कृषी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये या हेतूने सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत जिल्ह्यातील कृषी केंद्र सुरू, अशी मागणी कृषी केंद्र व्यावसायिकांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
३० मे रोजी होणार चित्र स्पष्ट- खरीप हंगामात कुठल्याही परिस्थिती जिल्ह्यात बियाणे टंचाई निर्माण होऊन नये, असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. असे असले तरी ३० मे रोजी वर्धा जिल्ह्यात आणखी बियाण्यांची गरज पडेल काय, हे चित्र स्पष्ट होणार आहे.