१० वर्षांत जिल्ह्यात ९१५ कि.मी. रस्तेकाम
By Admin | Updated: December 30, 2014 23:39 IST2014-12-30T23:39:32+5:302014-12-30T23:39:32+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २००१ ते २०१४ पर्यंत तब्बल २२६ कोटी ९९ हजार रुपयांचा निधी रस्ते बांधकामावर खर्च करण्यात आला.

१० वर्षांत जिल्ह्यात ९१५ कि.मी. रस्तेकाम
२२६ कोटींचा निधी खर्च : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून १३१ कामे पूर्ण
वर्धा : महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २००१ ते २०१४ पर्यंत तब्बल २२६ कोटी ९९ हजार रुपयांचा निधी रस्ते बांधकामावर खर्च करण्यात आला. यामध्ये १३१ कामांचा समावेश आहे. यामाध्यमातून ९१५.२६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. सोमवारपासून जिल्ह्यात सदर योजनेतील रस्त्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय समिती दाखल झाल्यामळे या रस्त्यांच्या बांधकामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.
सदर योजनेंत २०११-१२ पर्यंतची कामे पूर्णत्वास आल्याचे सदर बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. यानंतरच्या अकराव्या टप्प्यातील कामे प्रगतीपथावर असल्याचे म्हटले जात आहे; मात्र जिल्ह्यातील एकूणच पूर्णत्वास आलेल्या रस्त्यांचा ओझरता आढवा घेतला तर कुठेही रस्ते सुस्थितीत नसल्याचे चित्र आहे. सोमवारपासून जिल्ह्यात मुक्कामी असलेली समिती चौकशीतून काय सत्य बाहेर काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
केंद्रीय समिती प्रत्येक तालुक्यांतील रस्त्यांची कामे बघत आहे. पहिल्या दिवशी हिंगणघाट तालुक्यातील रस्त्यांची चौकशी केली.
मंगळवारी ही समिती सकाळी सेलू तालुक्यात गेली होती. दरम्यान, झडशी, आमगाव, दहेगाव, बोंडसुला, वासी, गिरगाव येथील कामे तपासण्यात आली.
समिती दुपारी झडशी परिसरात रस्त्याच्या चौकशीकरिता गेली होती; मात्र येथे या समितीतील एकही सदस्य वाहनातून खाली उतरुन नेमकी स्थिती जाणून घेण्याच्या भानगडीत पडला नाही. केवळ गाडीचे दार उघडून या समितीने काढता पाय घेतल्याची माहिती आहे.