आठ लाख रुपयांचा सुगंधीत तंबाखू जाळला
By Admin | Updated: October 9, 2015 02:29 IST2015-10-09T02:29:41+5:302015-10-09T02:29:41+5:30
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन वर्धा कार्यालयाने वेळोवेळी कारवाई करून जप्त केलेला सुगंधीत तंबाखू, ...

आठ लाख रुपयांचा सुगंधीत तंबाखू जाळला
अन्न व औषधी विभागाची कारवाई
वर्धा : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन वर्धा कार्यालयाने वेळोवेळी कारवाई करून जप्त केलेला सुगंधीत तंबाखू, पान मसाला व इतर अन्नपदार्थ गुरुवारी इंझापूर येथील डंपिंग यार्ड मध्ये जाळला. यावेळी एकूण ७ लाख ९६ हजार ४०३ रुपयांचा साठा नष्ट करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अन्न व औषध प्रशासन विभागाने २०१२ पासून सुगंधीत तंबाखू, पानमसाला, गुटखा व खर्रा इत्यादी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री, साठवणूक, वितरण व निर्मितीवर प्रतिबंध घातलेला आहे. असे असतांना सुध्दा चोरट्या पध्दतीने सुगंधीत तंबाखू व पानमसाला आदीची विक्री करण्यात येत आहे. यानुसार करवाई करून मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध कारवाईतून जप्त करण्यात आलेला गुटखा व इतर साहित्याची प्रकरणे सहायक आयुक्त (अन्न) वर्धा यांना प्रकरण सादर करण्यात आले. त्यांनी सदर साठा प्रतिबंधीत असल्याने नष्ट करण्याचे आदेश पारित केले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यावेळी पंचासह, आरोपी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व अधिकारी उपस्थित होते. सदरची संपूर्ण कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) वर्धाचे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तिवारी, धाबर्डे, नंदनवार यांच्यासह सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली.(प्रतिनिधी)