अन्न व औषध विभागाने घेतले अन्न पदार्थांचे ७६ नमुने
By Admin | Updated: October 30, 2016 00:42 IST2016-10-30T00:42:14+5:302016-10-30T00:42:14+5:30
दिवाळीनिमित्त बाजारात विविध अन्नपदार्थाची खरेदी व विक्रीचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यात भेसळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अन्न व औषध विभागाने घेतले अन्न पदार्थांचे ७६ नमुने
जिल्ह्यात अन्न पदार्थात भेसळीची संकेत
वर्धा : दिवाळीनिमित्त बाजारात विविध अन्नपदार्थाची खरेदी व विक्रीचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यात भेसळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दिवाळीनिमित्त विशेष मोहीम राबवून विविध अन्नपदार्थाचे एकूण ७६ नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण असल्यामुळे सदर सणानिमित्त जनतेकडून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थाची खरेदी करण्यात येते. त्यावेळी अन्न पदार्थामध्ये भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढते, अशा प्रवृत्तीवर आळा घालण्याकरीता तसेच जनतेस शुद्ध अन्न मिळण्याकरिता अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे, ललीत सोयाम आणि सु.पै. नंदनवार यांनी शहरात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील किरकोळ विक्रेता, वितरक, उत्पादक, मिठाई विक्रेता, दूध विक्रेता, किराणा अन्नपदार्थ विक्रेते इत्यादी सर्व स्तरावरून नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात आले आहेत. या मोहिमेत एकूण ७६ अन्न नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात आले. या ७६ अन्न नमुन्यांमध्ये खोब्रा बर्फी, बर्फी, पेढा, फरसाण, खाद्यतेल, दूध, मसाले, मिरची पावडर, हल्दी पावडर, बेसन, रवा, मैदा, आटा, वनस्पती, दही ईत्यादी जवळपास सर्व अन्नपदार्थ विश्लेषणाकरिता घेण्यात आले. सदर नमुने विश्लेषणाकरिता अन्न चाचणी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले असून आतापर्यंत १३ अन्न पदार्थाचे प्रमाणित अहवाल प्राप्त झाले असून ६३ अन्न नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. या अहवालानंतर त्या दुकानमालकांवर करवाई करण्यात येणार असल्याचे विभागाकडून कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)