पाच पालिकांसाठी ७३६ जणांची उमेदवारी
By Admin | Updated: October 30, 2016 00:45 IST2016-10-30T00:45:57+5:302016-10-30T00:45:57+5:30
२७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील सहाही नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या

पाच पालिकांसाठी ७३६ जणांची उमेदवारी
नगर पालिका निवडणूक : नगराध्यक्ष पदासाठी ५६, तर नगरसेवक पदासाठी ६८० नामांकन
वर्धा : २७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील सहाही नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीकरिता नामांकन अर्ज दाखल करण्याचा शनिवार अखेरचा दिवस होता. विविध राजकीय पक्षांसह अपक्षांकडूनही मोठ्या प्रमाणावर नामांकन दाखल करण्यात आले. वर्धा वगळता उर्वरित पाच नगर पालिकांमध्ये एकूण ७३६ नामांकन दाखल झाले. यात नगराध्यक्ष पदाकरिता ५६ तर नगरसेवक पदाकरिता ६८० नामांकन दाखल झाले. नामांकन दाखल करण्याकरिता आज सर्वच पालिका परिसरात इच्छुकांची समर्थकांसह झुंबड उडाली होती.
वर्धा नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरिता अनेकांनी नामांकन दाखल केले. मात्र रात्री उशिरापर्यंत नेमके किती नामांकन दाखल झाले, याची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली नव्हती. हिंगणघाट नगराध्यक्ष पदाकरिता २६ तर नगरसेवक पदांकरिता ३०७ नामांकन दाखल झाले आहे. आर्वी नगराध्यक्षाकरिता ८ तर नगरसेवकाकरिता १०४, पुलगाव नगराध्यक्षाकरिता ८ तर नगरसेवकांकरिता १०२ नामांकन दाखल झाले आहे. देवळी नगराध्यक्षपदाकरिता ४ व नगरसेवक पदाकरिता ७२ नामांकन दाखल झाले आहे. राजकीय पक्ष कुणाला उमेदवारी देते याची प्रतीक्षा नागरिकांना होती. ही प्रतीक्षा आज संपली. वर्धा, देवळी व पुलगाव पालिकेत खा. रामदास तडस व आ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल केले. अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पालिका आवारात कार्यकर्त्यांची गर्दी होती. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.(प्रतिनिधी)
पुलगाव पालिका नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी १०२ अर्ज
पुलगाव : स्थानिक नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुक व समर्थकांची भाऊगर्दी झाली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी आज १०२ नामांकनपत्र दाखल करण्यात आले.
सकाळी कार्यालय सुरू झाल्या पासून सर्व राजकीय पक्ष व अपक्षांकडून नामांकनपत्र दाखल करणे सुरू झाले. राज्यात सत्तारुढ प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपाने खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या उपस्थितीत वंदना गाते यांनी नामांकन दाखल केले. तर काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष रमेश सावरकर, राजन चौधरी, अश्विन शाह यांच्या उपस्थितीत रंजना पवार यांनी नामांकन अर्ज दाखल केला. सेनेकडून कविता सुनील ब्राम्हणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला., राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्याम देशमुख यांच्या उपस्थितीत वैशाली देशमुख यांनी नामांकन दाखल केले. बसपातर्फे वर्षा कुंदन जांभुळकर यांनी नगराध्यक्षपदासाठी नामांकनपत्र दाखल केले. या व्यतिरिक्त नगराध्यक्षपदासाठी चंद्रकला डोईफोडे, संगीता रामटेके, छाया ओंकार धांदे, संगीता कादी यांनी आपले नामांकन पत्र दाखल केले.
नगरसेवक पदाकरिता भाजपा, सेना, बसपा व काँग्रेस या प्रमुख पक्ष व अपक्षासह १०२ नामांकनपत्र दाखल करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून राजकुमारी शाह, मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, नायब तहसीलदार राठोड इत्यादिनी नामांकनपत्र स्वीकारले. (तालुका प्रतिनिधी)