जिल्ह्यात सिकलसेलचे ७२५ रुग्ण
By Admin | Updated: June 19, 2015 00:20 IST2015-06-19T00:20:07+5:302015-06-19T00:20:07+5:30
जिल्ह्यात आरोग्य अभियानात ५ लाख ४१ हजार ६७७ रक्ताचे नमुने तपासण्यात असले असता यात ७२५ सिकलसेलचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात या आजाराने पाय पसरविल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात सिकलसेलचे ७२५ रुग्ण
वर्धा : जिल्ह्यात आरोग्य अभियानात ५ लाख ४१ हजार ६७७ रक्ताचे नमुने तपासण्यात असले असता यात ७२५ सिकलसेलचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात या आजाराने पाय पसरविल्याचे समोर आले आहे. या व्यतिरिक्त ९ हजार ३० जण सिकलसेलचे वाहक असल्याचे समोर आले आहे. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला निधी प्राप्त असून अनेक अशासकीय संस्थांच्या माध्यमातून नियंत्रणाचे कार्य सुरू आहे.
या आजाराचे प्रमाण दुर्गम भागातील जमातीत अधिक आहे. जिल्ह्यात १० प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, सामान्य रुग्णालय येथे सिकलसेलची सोल्युबिलिटी चाचणी मोफत होते. आरोग्य सेविका, आशा सेविका, स्वयंसेवकाच्या माध्यमातून रुग्णांना समुपदेशन, औषधोपचार केला जातो. सिकलसेल रुग्णाला ‘रेडकार्ड’ दिले जाते. तर वाहकाला ‘येलो’ आणि ‘व्हाईट कार्ड’ दिले जाते. या रुग्णाच्या नियमित संपर्कात राहुन आढावा घेतला जातो. जिल्हा स्तरावर सिकलसेल समन्वयक यावर देखरेख ठेवून सूचना देतात. प्रयोगशाळेत तीन प्रकारे रक्ताची तपासणी करून या आजाराचे निदान होेते. सोल्युबिलिटी चाचणीत सिकल हिमोग्लोबिनचे अस्तित्व आहे किंवा नाही. अस्तित्व असेल तर इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी करून सिकलसेल वाहक अथवा रुग्ण यांचे निदान केले जाते. एचपीएलसी चाचणीतून संपूर्ण रक्तातील पेशींची मोजणी करून रक्तपेशीची संख्या, आकार व हिमोग्लोबिनची पातळी याचा बोनमॅरो योग्यप्रकारे काम करीत आहे किंवा नाही याची पाहणी केली जाते.(स्थानिक प्रतिनिधी)
लग्नापूर्वी सिकलसेलची तपासणी आवश्यक
सिकलसेल हा अनुवांशिक आजार आहे. इंग्रजीत विळ्याला सिकल तर पेशीला सेल म्हणतात. असामान्य हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचा आकार बदलतो. विळ्याच्या आकारातील पेशी मानवी रक्तात आढळल्यास त्याला सिकलसेल संबोधतात.
पेशीचा आकार बदलल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये त्या अडकतात. परिणामी शरीरातील सर्व अवयवांना प्राणवायूचा पुरवठा कमी होतो. त्यातून व्यक्तीला वेदना होतात.
येणारी पिढी सिकलसेल मुक्त जन्माला यावी यासाठी सिकलसेल वाहकांनी निरोगी व्यक्तीशी लग्न केल्यास बाळ निरोगी जन्मास येण्याची शक्यता बळावते. मात्र वाहकाने वाहक व्यक्तिसोबत विवाह करू नये.
रुग्णांकरिता विविध योजना
सिकलसेल वाहक व ग्रस्त रूग्णांना मोफत समुपदेशन, औषधोपचार व संदर्भसेवा पुरविली जाते. याशिवाय शासकीय रक्तपेढीतून रूग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो.
सिकलसेल रूग्णांकरिता संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ६०० रूपयांची मदत, राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ, सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी प्रती तास २० मिनिटे अतिरिक्त वेळ, उपचारादरम्यान सिकलसेल रूग्ण व त्याच्या एका मदतनीसाला मोफत एस.टी. बसचा प्रवास यासह आदी सुविधा दिल्या जातात.
प्रत्येक गावात महिन्यातील एक दिवस हा आरोग्य व पोषण आहार दिवस म्हणून पाळण्यात येतो. या अंतर्गत गावातही सिकलसेलची तपासणी करता येणे शक्य आहे.