दीड वर्षांत ७०७ सर्पदंश
By Admin | Updated: August 7, 2016 00:12 IST2016-08-07T00:12:33+5:302016-08-07T00:12:33+5:30
पावसाळ्याच्या दिवसांत शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे.

दीड वर्षांत ७०७ सर्पदंश
सहा जणांचा मृत्यू : जिल्ह्यात मुबलक औषधीसाठा
रूपेश खैरी वर्धा
पावसाळ्याच्या दिवसांत शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. यात वेळीच उपचार मिळाला तर त्यांचे प्राण वाचणे शक्य असल्याचे वर्धा जिल्ह्यात दिसून आले आहे. जिल्ह्यात गत दीड वर्षात ७०७ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. यातील केवळ सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही आकडेवारी शासकीय असून हा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय अशा एकूण आठ रुग्णालयांत गत दीड वर्षांत सर्पदंश झालेले एकूण ६३२ रुग्ण उपचाराकरिता दाखल झाले. यात २०२५-१६ या आर्थिक वर्षात ५६६ सर्पदंशाच्या रुग्णाची नोंद करण्यात आली असून यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर याच आठ रुग्णालयांत सुरू वार्षिक सत्रात सर्पदंशाचे ६६ रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यात जिल्हा आरोग्य विभागाला यश आले असून यातील एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे. तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांत सर्पदंश झालेले एकूण ६५ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सुरू वर्षांत केवळ १० रुग्ण आले असून त्यांच्यावर उपचार झाल्याने कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
शासनाने मागविली सर्पमित्रांची माहिती
साप म्हणताच अनेकांच्या अंगावर काटा उभा झाल्याशिवाय राहत नाही. सापांची भीती सर्वसमान्यांना वाटत असल्याने वर्धेत सापांपासून त्यांच्या बचावाकरिता व सर्परक्षणाकरिता जिल्ह्यात अनेक सर्पमित्र पुढे आले आहेत; मात्र त्यांची कुठलीही नोंद जिल्ह्याच्या वनविभागात नाही. शिवाय त्यांच्याकडून पकडण्यात येत असलेल्या सापांची नोंदही वन विभागाकडून कुठेच करण्यात येत नसल्याने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्पमित्रांची माहिती गोळा करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने देण्यात आल्याची माहिती आहे.
वर्धेत २० च्या वर सर्पमित्र कार्यरत
जिल्ह्यात घरोघरी निघणारे साप पकडण्याकरिता वर्धा, हिंगणघाट, आर्वी व समुद्रपूर या तालुक्यात एकूण २० सर्पमित्र असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून साप पकडून तो वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. असे कधी कधीच होत असून सर्पमित्रच पकडलेले साप शहरालगत असलेल्या जंगलात सोडत असल्याचे दिसून आले आहे. या सर्पमित्रांसह सापांची कुठेच नोंद होत नाही.