67,628 व्यक्तींची काेविड लसीकडे पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST2021-09-13T05:00:00+5:302021-09-13T05:00:02+5:30
शंभर टक्के कोविड लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून रोख पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहराशेजारीलच नऊ ग्रामपंचायती लसीकरणाबाबत उदासीन असल्याचे ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

67,628 व्यक्तींची काेविड लसीकडे पाठ!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविडच्या तिसऱ्या लाटेला ब्रेक लावण्यासह कोविड मृत्यू रोखण्यासाठी लस ही उपयुक्तच आहे. असे असले तरी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहराशेजारील नऊ ग्रामपंचायत क्षेत्रांतील तब्बल ६७ हजार ६२८ व्यक्तींनी अजूनही कोविडची लस घेतली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.
शंभर टक्के कोविड लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून रोख पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहराशेजारीलच नऊ ग्रामपंचायती लसीकरणाबाबत उदासीन असल्याचे ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), सिंदी (मेघे), सेवाग्राम, वरुड, म्हसाळा, पिपरी (मेघे), पवनार या ग्रामपंचायती वर्धा शहराशेजारी असून, या नऊ ग्रामपंचायतीमधील एकूण ९३ हजार २७८ व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. मात्र, १६ जानेवारीपासून जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम सुरू होऊन आतापर्यंत केवळ २५ हजार ६४९ व्यक्तींनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे; तर १० हजार ७६४ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. कोविड संकट काळात लस हिच सध्यातरी प्रभावी खबरदारीचा उपाय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
पवनार अन् सेवाग्रामला ऐतिहासिक वारसा
- सेवाग्राम येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली; तर आचार्य विनोबा भावे यांनी पवनार येथून भूदान चळवळीला दिशा दिल्याने सेवाग्राम आणि पवनार या गावांना ऐतिहासिक वारसा आहे. परंतु, कोविड संकटकाळात फायद्याची ठरणाऱ्या कोविड लसीकरण मोहिमेबाबत या दोन्ही ग्रामपंचायती पाहिजे तसा पुढाकार घेताना दिसत नाहीत.