शिक्षण करातून ६.७५ कोटी वसूल
By Admin | Updated: June 11, 2014 00:11 IST2014-06-11T00:11:42+5:302014-06-11T00:11:42+5:30
शहरातून शिक्षणकराच्या नावावर गत आठ वर्षांत सहा कोटी ७५ लाख २१ हजार ६२२ रुपये वसूल करण्यात आले. हा कर वर्धा वासियांकडून नगर पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असला तरी पालिकेच्या शिक्षण

शिक्षण करातून ६.७५ कोटी वसूल
माहितीचा अधिकार : पालिकेच्या शाळांचे खस्ता हाल, नावाचे फलक बेपत्ता, बसण्याकरिता बाकही नाही
रूपेश खैरीे - वर्धा
शहरातून शिक्षणकराच्या नावावर गत आठ वर्षांत सहा कोटी ७५ लाख २१ हजार ६२२ रुपये वसूल करण्यात आले. हा कर वर्धा वासियांकडून नगर पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असला तरी पालिकेच्या शिक्षण विभागाला याचा कुठलाही लाभ होत नसल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. मग शहरातून हा कर कशाकरिता, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
नगर परिषदेच्यावतीने कर आकारताना प्रत्येक रहिवाशाकडून शिक्षणकर वसूल करण्यात येतो. या कराचा वापर शहराच्या शैक्षणिक विकासाकरिता करण्यात येत असल्याची धारणा कर देणाऱ्याच्या मनात येत आहे; मात्र वास्तव काही औरच आहे. या कराचा पालिकेला कुठलाही लाभ नाही. त्यांना यातील एक टक्काही वापरण्याची मुभा नाही. शासनाला शिक्षण कराच्या नावावर एवढा कर देणाऱ्या येथील पालिकेच्या शाळांची मात्र दैना झाली आहे.
शहरात पालिकेच्या एकूण ११ शाळा आहेत. यात दहा प्राथमिक व एका हायस्कूलचा समावेश आहे. या शाळातून पालिकेच्यावतीने ज्ञानदानाचे कार्य होते. ज्ञानदान होत असल्याने या इमारती विविध सुविधांना सुसज्ज असणे अनिवार्य आहे. तसे शासनाचे नियमही आहेत. असे असताना येथे कुठल्याही सुविधा नाहीत. शिक्षणाच्या नावावर मोठा कर शासनालास देणाऱ्या पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्याकरिता साधे बाक नाहीत. त्यांना शाळेत चटईवर बसावे लागते. त्याही फाटक्याच. पिण्याकरिता शुद्ध पाणी नाही, तर स्वतंत्र शौचालयाची सुविधा शहरातील पालिकेच्या एकाही शाळेत नसल्याचे दिसून आले आहे.
शासनाच्या नियमानूसार सर्वच शाळेत मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र शौचालय देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र वर्धा शहरातील पालिकेच्या कुठल्याही शाळेत अशी सुविधा नाही. शहरातून वसूल होत असलेल्या कराच्या रक्कमेतून काहीच मिळत नसले तरी शासनाकडून येत असलेले ८० टक्के अनुदान व पालिकेचा २० टक्क्यांचा वाटा यातून पालिकेच्या शिक्षण विभागाचे कार्य सुरू असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. सुरू महिन्याच्या २६ तारखेपासून नवे शैक्षधिक सत्र सुरू आहे. असे असताना पालिकेच्या एकाही शाळेची रंगरंगोटी वा कुठलीही दुरूस्ती करण्यात आली नाही. शहरातील प्रत्येक शाळेला मोठ्या विभुतींची नावे देण्यात आली आहेत. त्यांची नावेही या शाळांवर दिसत नाही. काही ठिकाणी तर पालिकेची शाळा आहे हे कुणाला शोधूनही सापडणे कठीण आहे.