११,७०२ लाभार्थ्यांना ६६ लाखांचे वितरण
By Admin | Updated: April 4, 2017 01:17 IST2017-04-04T01:17:10+5:302017-04-04T01:17:10+5:30
तालुक्यातील संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ११ हजार ७०२ लाभार्थ्यांच्या मानधनापोटी फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण ६६ लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा झाले आहे.

११,७०२ लाभार्थ्यांना ६६ लाखांचे वितरण
संजय गांधी निराधार योजना : यानंतरचे अनुदान आॅनलाईन
आर्वी : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ११ हजार ७०२ लाभार्थ्यांच्या मानधनापोटी फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण ६६ लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा झाले आहे. एप्रिल महिन्यापासून आता सर्वच योजनेचे मानधन आॅनलाईन होणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
तालुक्यात महसूल विभागाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत संजय गांधी योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी वृद्धापकालीन योजना या योजनेंतर्गत तालुक्यातील निराधारांना प्रत्येकी ६०० रुपये मानधन देण्यात येते.
सर्वाधिक अनुदान श्रावण बाळ योजनेचे
आर्वी : तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे २००२, श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेचे ७०६३ तर इंदिरा गांधी वृद्धापकालीन योजनेचे २६३७ लाभार्थी आहे. या सर्व ११ हजार ७०२ लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी २०१७ पर्यंतचे अनुदान बँक खात्यामार्फत देण्यात आले आहे. यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना १३ लाख ५० हजार ७०० रुपये, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना ४२ लाख ४३ हजार २०० रुपये, इंदिरा गांधी वृद्धापकालीन लाभार्थ्यांना १० लाख ९४ हजार ८०० रुपये अनुदानाची रक्कम वाटप करण्यात आली आहे. या महिन्यापासून या योजना आॅनलाईन होत असून तालुक्यातील लाभार्थ्यांनी गावातील महाई सेवा केंद्रामार्फत गरजू लाभार्थ्यांना लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या तिन्ही योजनेतील लाभार्थ्यांनी पुढील अनुदानाकरिता आपल्या हयातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. यात ३१ मार्च पर्यंत लाभार्थ्यांनी स्वत:चे बँक खाते व हयात असल्याचे प्रमाणपत्राची नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी तालुक्यातील सर्व महाई सेवा केंद्राना लाभार्थ्यांना देण्यात येणारे कागदपत्राची पुर्तता करण्यात आली आहे. यातून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)
संजय गांधी व इतर योजनेतील लाभार्थ्यांनी तालुक्यातील जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन आपली नोंदणी करावी. इतर लाभार्थ्यांनी ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करावे.
- एस.एम. कावटी, नायब तहसीलदार संजय गांधी योजना, आर्वी
वर्धा ग्रामीणच्या बैठकीत २६५ प्रकरणे मंजूर
वर्धा : तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार समिती वर्धा ग्रामीणची बैठक समितीचे अध्यक्ष मनोज तरारे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यात श्रावण बाळ निराधार, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार योजनांची विविध ४३५ प्रकरण नायब तहसीलदार बर्वे यांनी समिती समोर ठेवली. त्या प्रकरणाची तपासणी समितीने २६५ प्रकरणे मंजूर केली. १५५ प्रकरण त्रुटी आढळून आली तर १५ प्रकरण नामंजूर केली. यावेळी समितीचे सदस्य दीपक बावनकर, आशिष कुचेवार, बार्शिरामजी मानोले, भावना वाडीभस्मे, भोयर, निवाल, बंटी गोसावी, फारुख शेख, कर्मचारी शेंडे, सांगले आदी उपस्थित होते.
वर्धेत संजय गांधी योजनेची ५९ प्रकरणे मंजूर
वर्धा : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना शहर अंतर्गत समितीच्या सभेत समितीचे अध्यक्ष तहसीलदार एम.आर.चव्हाण यांनी सर्व सदस्याच्या सर्वानुमते इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेंतर्गत ८५ पैकी ५९ प्रकरणे मंजूर केली. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ८० प्रकरणापैकी ५७ प्रकरणे मंजूर केली. उर्वरित प्रकरणे त्रुटीमध्ये ठेवण्यात आली आहे. बैठकीला जी. सी. बर्वे, निलेश किटे, संजय बघेल, मेघा उईके, प्रदीप कोलते, विशांत इंगळे उपस्थित होते. सदस्य किटे यांनी तहसील कार्यालयात अवैध एजंट गरजवंतांची लूट करीत असल्याचा मुद्दा सभेत मांडला. यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करणे, संजय गांधी योजनेची सभा प्रत्येक महिन्यामध्ये न चुकता घ्यावी, लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, सभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पत्राद्वारे कळविण्यात यावे, अशा सूचना समितीच्यावतीने करण्यात आल्या आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)