पवनार येथे ६५ मेंढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:54 IST2018-01-16T23:54:08+5:302018-01-16T23:54:26+5:30
येथील मेंढपाळाच्या अचानक ६५ मेंढ्या दगावल्याने त्याच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. करण रामा रब्बारी या मेंढपाळाच्या यात २ लाख ६० हजाराचे नुकसान झाले. ही घटना पवनार शिवारात सकाळी उघडकीस आली.

पवनार येथे ६५ मेंढ्यांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : येथील मेंढपाळाच्या अचानक ६५ मेंढ्या दगावल्याने त्याच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. करण रामा रब्बारी या मेंढपाळाच्या यात २ लाख ६० हजाराचे नुकसान झाले. ही घटना पवनार शिवारात सकाळी उघडकीस आली.
खरीप हंगामात खाली झालेल्या कपाशीच्या शेतात मेंढपाळ आपला मुक्काम करतात. आज या शेतात तर उद्या त्या शेतात असा त्यांचा प्रवास असतो. घटनेच्या दिवशी मेंढपाळाने आपला बेढा बाबाराव सोनटक्के यांच्या शेतात टाकला. एक दिवस कपाशीचे दोन चराई करून दुसरे दिवशी दुपारी नदीवर पाणी पाजून आणल्यानंतर मेंढ्यांना जागी बांधून ठेवण्यात आले. करणकडे एकूण ६०० मेंढ्या आहेत यापैकी ५२ मेंढ्या सोमवारच्या रात्री अचानक मृतावस्थेत दिसून आल्या.
सध्या कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप आहे. या प्रकोपातून बचावाकरिता शेतकºयांनी विविध घातक विषारी औषधांची फवारणी केली आहे. यामुळे मेंढ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असून कपाशी खाल्याने झाली नाही, हे स्पष्ट होते. मेंढीधारकाला विम्याबाबत विचारणा केली असता विमा नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला विम्याचीही भरपाई मिळणार नाही. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनवीज यांना याबाबत माहिती दिली असून शवविच्छेदनकरिता चमूला पाचारण करणार असल्याचे सांगितले. कृषी सहाय्यक प्रशांत भोयर यांनाही या प्रकाराची सूचना करण्यात आली आहे. त्यांनी सुध्दा घटनास्थळाला भेट देवून वरिष्ठांना माहिती देत असल्याचे सांगितले.
वेळीच सावधानता बाळगणे गरजेचे
पवनार येथे करण रब्बारी नामक मेंढपाळाच्या मेंढ्या दगावल्या. यात त्याने मोठे नुकसान झाले. त्याचे हे नुकसान भरून निघणे कठीण आहे. त्याच्या मेंढ्या विषबाधाने दगावल्या असे बोलले जात आहे. असे असेल तर ठीक. मात्र जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या बोंडअळीच्या प्रकोपाणे जर या मेंढ्या दगावल्या असतील तर शेतकºयांकरिता ही धोक्याची घंटा आहे. कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त बोंड बैलांना वा जनावरांना खायला दिल्यास यात विषबाधा होवून जनावरांचा मृत्यू उद्भवण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे शेतकºयांनी वेळीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.