सिंदी पालिकेचा ६.३९ कोटींचा अर्थसंकल्प
By Admin | Updated: March 11, 2015 01:43 IST2015-03-11T01:43:48+5:302015-03-11T01:43:48+5:30
नगर पालिकेने ६.३९ कोटीच्या अर्थसंकल्पाला विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजुरी दिली. हा अर्थसंकल्प नगराध्यक्ष सुनिता कलोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला.

सिंदी पालिकेचा ६.३९ कोटींचा अर्थसंकल्प
सिंदी (रेल्वे): नगर पालिकेने ६.३९ कोटीच्या अर्थसंकल्पाला विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजुरी दिली. हा अर्थसंकल्प नगराध्यक्ष सुनिता कलोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला. यात विकासकामांवर भर आहे.
गत वर्षिची शिल्लक ५७ लाख १८ हजार रुपये असून नगराध्यक्षांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडला तो सर्वांनुमते संमत करण्यात आला. अर्थसंकल्पात घरकुल, आरोग्य सेवेकरिता पूर्ण अनुदान, विशेष रस्ता अनुदान, रस्ता अनुदान, १३ वा वित्त आयोग, नागरी भागातील दलित वस्ती सुधारणा, अल्पसंख्यक इत्यादी विभागातील विकास कामांचे नियोजन करण्यात आले. सन २०१५-१६ मध्ये होणाऱ्या खर्चात घरकुल बांधकामाकरिता १५ लक्ष, विशेष रस्ता अनुदानान म्हणून १.७६ कोटी, १३ वा वित्त आयोग ४० लक्ष, नागरी भागातील दलित वस्तीकरिता ३५ लक्ष, अल्पसंख्यक १० लक्ष, वैशिष्टपुर्ण अनुदान म्हणून ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ही नगर पालिका ‘क’ वर्ग असून जिल्ह्यातील सर्वात लहान आहे. यामुळे नगरपालिकेचे स्वत:चे उत्पन्न अत्यल्प आहे. या अल्पशा उत्पन्नात सिंदी शहराचा विकास शक्य नसल्याने शासनाच्या विविध योजनेमधून तसेच जिल्हा नियोजन समितीकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून सिंदी शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यावर नगराध्यक्षांनी भर दिला. सदर सभेत सिंदी शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने भर देण्यात आला आहे.
नगर परिषदेंतर्गत येत असलेल्या म्यु. नेहरू विद्यालयाला १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे शताब्दी महोत्सव कार्यक्रमाकरिता अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे. सन २०१५-१६ चे उत्पन्न ६ कोटी ३९ लाख १२ हजार २७२ असून खर्च ६ कोटी ३६ लाख ३२ हजार ५०० रुपये आहे. या सभेला परिषदेचे नगरसेवक उपस्थित होते. अंदाजपत्रकाचे वाचन प्रभारी लेखापाल सलीम बेग यांनी केले.(प्रतिनिधी)