तहसील कार्यालयातील ६० वर्षे जुने झाड कोसळले
By Admin | Updated: July 24, 2015 01:55 IST2015-07-24T01:55:31+5:302015-07-24T01:55:31+5:30
रात्री आलेल्या सततच्या पावसामुळे स्थानिक तहसील कार्यालय परिसरातील कडूलिंबाचे मोठे झाड मुळापासून कोलमडून पडले.

तहसील कार्यालयातील ६० वर्षे जुने झाड कोसळले
प्राणहानी टळली : तीन लाख १० हजारांचे नुकसान
हिंगणघाट : रात्री आलेल्या सततच्या पावसामुळे स्थानिक तहसील कार्यालय परिसरातील कडूलिंबाचे मोठे झाड मुळापासून कोलमडून पडले. यात एका कार आणि सायकल रिक्षाचे जवळपास ३ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले. गुरूवारी सकाळी ही घटना घडल्याने कोणतीही प्राणहानी झाली नाही.
बुधवारी रात्री ८ वाजता मुसळधार पावसाला सुरूवात होऊन सकाळपर्यंत ८७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. संततधार पावसामुळे तहसील कार्यालयाचे मुख्य गेट जवळचे कडूनिंबाचे सुमारे ५०-६० वर्षे जुने मोठे झाड मुळापासून कोलमडून कार व रिक्षावर कोसळले. ही घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी अर्जनवीस रमेश हिंगमीरे यांचा मुलगा नितीन हिंगमिरे हा कार क्र. एम.एच. ३२ सी. ५४०१ ने संगणक व कागदपत्रे घेऊन आला होता. दरम्यान, कारवर कडूनिंबाचे झाड कोसळले. तत्पूर्वी त्यांनी संगणक व सर्व साहित्य कारमधून बाहेर काढले होते. यामुळे इतर हानी झाली नाही; पण कारचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. लगतच्या सायकल रिक्षावरही झाड कोसळल्याने त्याचे १० हजारांचे नुकसान झाले. घटनेची तहसीलदार दीपक कारंडे यांनी पाहणी केली.(तालुका प्रतिनिधी)