वर्धेत दिवसाला ५२ हजार लिटर पेट्रोल-डिझेल जळते!

By Admin | Updated: December 17, 2015 02:04 IST2015-12-17T02:04:31+5:302015-12-17T02:04:31+5:30

‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य’ या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’ने ठेवलेला प्रस्ताव स्वागतार्ह आहे.

52 thousand liters of diesel dies in Wardhaat! | वर्धेत दिवसाला ५२ हजार लिटर पेट्रोल-डिझेल जळते!

वर्धेत दिवसाला ५२ हजार लिटर पेट्रोल-डिझेल जळते!

‘नो व्हेईकल डे’चा जागर : दर आठवड्यात ही बचत झाल्यास वायू प्रदूषणालाही आळा बसणार
राजेश भोजेकर वर्धा
‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य’ या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’ने ठेवलेला प्रस्ताव स्वागतार्ह आहे. अशा भावना व्यक्त करीत ‘लोकमत’ने घेतलेल्या या इनिशिएटिव्हचे वर्धेकरांनी जोरदार स्वागत केले.
वर्धेत वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची स्थिती जाणून घेतली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. शहरात व सभोवताल १० पेट्रोलपंप आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहा पेट्रोलपंपवरुन दररोज २४ हजार लिटर पेट्रोल आणि २८ हजार लिटर डिझेलची विक्री होते. पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६५.९३ रुपये इतका आहे. दररोज १५,८२,३२० रुपयांचे पेट्रोल वाहनात टाकल्या जाते. डिझेलचा प्रतिलिटरचा दर ५२.७० रुपये इतका आहे. या मानाने दररोज १४,७५,६०० रुपयांच्या डिझेलची विक्री होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीची बेरीज केल्यास दररोज वर्धेकर ३०,५७,९२० रुपयांचे इंधन वाहनासाठी खरेदी करतात. महिन्याकाठी हा आकडा ९ कोटी १७ लाख ३७ हजार ६०० रुपयांवर जातो. वर्षभराचा विचार केल्यास हा आकडा ११० कोटी ८ लाख ५१ हजार २०० इतका होतो. आठवड्यातून एक दिवस याप्रमाणे महिन्यातून निदान चार दिवस वर्धेकरांनी ‘नो व्हेईकल वा सायकल डे’ पाळल्यास १ कोटी २२ लाख ३१ हजार ६८० रुपयांची बचत करता येणे शक्य आहे.
नैसर्गिक वातावरणात जीवन जगण्याचा आनंद तर मिळणारच शिवाय शरीराचा व्यायाम आणि समाज सुदृढ करण्यासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल ठरेल. यासाठी आता आठवड्यातील कोणताही एक दिवस ठरविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

आठवड्यातील एक दिवस ‘नो व्हेईकल वा सायकल डे’ पाळल्यास महिनाभरात एक कोटींचे इंधन बचत
चंद्रपुरात ‘नो व्हेईकल डे’ सुरू झाल्यानंतर आता वर्धेतही नो व्हेईकल डेचा जागर सुरू झाला आहे. ‘लोकमत’च्या या पर्यावरणपूरक प्रस्तावाचे वर्धेकरांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. इतकेच नव्हे, तर यावर वर्धेकरांमध्ये सकारात्मक विचारमंथनही होत आहे. हा उपक्रम आठवड्यातून एक दिवस राबविल्यास वर्धेकरांचे पेट्रोल-डिझेलसाठी खर्च होणारे ३० लाख ५७ हजार ६०० रुपये वाचतील. महिन्यातून चार दिवसही हा दिवस पाळला, तर ही बचत तब्बल १ कोटी २२ लाख ३१ हजार ६८० रुपयांच्या घरात जाईल. यासोबतच पर्यावरण बचाव होईल, शिवाय शहरातील वाहतुकीच्या कोंडीपासून महिन्यातून चार दिवस सुटका होईल. वाहनांच्या धुरांड्यामुळे होणार होणारे प्रदूषण काही प्रमाणात कमी करण्यात यश येईल. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मदत मिळेल, असे अनेक फायदे या माघ्यमातून होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नो व्हेईकल वा सायकल डे’ जाहीर करावा!
जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातला कोणताही एक दिवस ‘नो व्हेईकल वा सायकल डे’ म्हणून जाहीर करावा. ही सुरुवात शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपासून झाल्यास या मोहीमेत वर्धेकर आपुलकीने सहभागी होतील, असा सूरही वर्धेकरांमध्ये उमटत आहे.
‘लोकमत इनिशिएटीव्ह’चे वर्धेकरांकडून जोरदार स्वागत
‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य’ या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’ने ठेवलेल्या प्रस्तावाचे वर्धेकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. अनेकांनी भ्रमणध्वनीवरुन हा उपक्रम वर्धेत सुरू झाल्यास आम्ही त्यात सहभागी होऊ अशा भावनाही यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. प्रत्येकांची या उपक्रमात सहभागी होण्याची मनोमन इच्छा आहे. मात्र पुढाकार कोण घेणार, याची प्रत्येकांना वाट असल्याचा सूरही यामाध्यमातून पुढे आला आहे.
‘सोशल’ मीडियावर जागर
‘नो व्हेईकल डे’ वर्धेतही सहज शक्य’ हे वृत्त बुधवारी सकाळपासूनच विविध सोशल मीडियावर फिरत आहे. यामाध्यमातून प्रस्तावाबाबत जागर सुरू आहे.

Web Title: 52 thousand liters of diesel dies in Wardhaat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.