५२ दिवसांनी ‘त्या’ आंदोलनाची दखल
By Admin | Updated: December 26, 2015 02:18 IST2015-12-26T02:18:35+5:302015-12-26T02:18:35+5:30
येथील बस स्थानक परिसरात बांधण्यात आलेल्या गाळ्यांचे वाटप नियमबाह्य केल्याचा आरोप करीत निर्भय पांडे या इसमाने शांततापूर्ण आंदोलन सुरू केले होते.

५२ दिवसांनी ‘त्या’ आंदोलनाची दखल
चौकशी अहवाल वरिष्ठांकडे : १२ दुकान गाळे बांधकामप्रकरण
गिरड : येथील बस स्थानक परिसरात बांधण्यात आलेल्या गाळ्यांचे वाटप नियमबाह्य केल्याचा आरोप करीत निर्भय पांडे या इसमाने शांततापूर्ण आंदोलन सुरू केले होते. ५२ दिवसानंतर या आंदोलनाची दखल घेत तहसीलदारांनी निर्भय पांडे आणि समुद्रपूरचे गटविकास अधिकारी यांची १९ डिसेंबर ला बैठक घेतली. तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. चौकशीअंती संबंधितांवर काय कारवाई होणार व गाळ्यांसंदर्भात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गिरड येथील बसस्थानक परिसरात ग्रामविकास आराखड्यातून १२ दुकान गाळे बांधण्यात आले. त्यातील काही गाळ्यांचा लिलाव झाला तर काही अतिक्रमण धारकांना व अपंगाना वाटप करण्यात आले. परंतू सदर गाळेवाटप हे ग्रामपंचायतने गैर मार्गाने व नियमबाह्य केल्याचा आरोप करीत येथील निर्भय पांडे याने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू केले. यात त्याला सहा दिवस तुरुंगातही जावे लागते. तरीही त्याने आंदोलन सुरूच ठेवले.
अखेर ५२ दिवसांनंतर समुद्रपूर येथील तहसीलदारांनी गटविकास अधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले. बिडीओंनी ग्राम विकास विस्तार अधिकारी समुद्रपूर यांच्या मार्फत चौकशी केली. या चौकशीत गाळे वाटप नियमबाह्य झाल्याचे जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या अहवालात नमूद केले. तसेच ग्राम पंचायतचा ठराव मंजूर नसताना गाळे वाटप करणे, गाळे धारकांकडून अनामत जमा करून करारनामा करणे यासाठी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना कार्यवाहीस पात्र धरण्यात आले, तसेच तत्कालीन सरपंचांनासुद्धा कारवाईस पात्र धरले आहे. यामुळे येथील राजकीय व शासकीय वर्तूळात हा मुद्दा वारंवार चर्चिला जात आहे.
आता तरी तक्रारकर्त्यांस न्याय मिळणार काय, गाळे वाटपाचा फेर लिलाव होणार काय, झालेले गाळे वाटप रद्द होईल काय यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई होते याकदे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर आंदोलन परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. तब्बल ५२ दिवसांपासून सदर आंदोलन सुरू आहे. आठवडाभरात प्रकरण निकाली काढून संबंधितांवर कारवाई करावी तसेच आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी पांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.(वार्ताहर)