४९,४५८ शेतकरी कुटुंबांची स्वस्त धान्याकरिता भटकंती

By Admin | Updated: February 28, 2017 01:12 IST2017-02-28T01:12:04+5:302017-02-28T01:12:04+5:30

शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ मिळण्याकरिता विशेष पॅकेज अंतर्गत योजना राबविली.

49, 458 Farmers' Families Ways To Get Cheap Foodgrains | ४९,४५८ शेतकरी कुटुंबांची स्वस्त धान्याकरिता भटकंती

४९,४५८ शेतकरी कुटुंबांची स्वस्त धान्याकरिता भटकंती

जिल्ह्याचे आवंटन मंजूर : धान्य दुकानात पोहोचण्याकरिता आणखी काही दिवसांचा विलंब
रूपेश खैरी वर्धा
शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ मिळण्याकरिता विशेष पॅकेज अंतर्गत योजना राबविली. आजस्थितीत योजनेंतर्गत वितरीत होणारे धान्य दुकानांत नसल्याने ही योजना कागदावर असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहे. यामुळे योजनेचे लाभार्थी असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४९ हजार ४५८ शेतकरी कुटुंबांची स्वस्त धान्याकरिता वाताहात होत आहे.
धान्याकरिता स्वस्त धान्य दुकानात गेलेल्या शेतकऱ्यांना दुकान मालक तुमचे धान्य यायचे आहे, असे म्हणत आल्या पावली परत पाठवितो. हा प्रकार आजचा नाही तर गत दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. जिल्ह्यातील काही दुकानात तर शेतकरी पॅकेजचे धान्य उपलब्ध नसल्याचे फलक लावले आहे. यामुळे लाभार्थी शेतकरी कुटुंबाची चांगलीच पंचाईत होत आहे.
शासनाच्या आदेशानुसार विशेष पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना धान्य पुरविण्याकरिता एकूण ८८८ दुकाने आहेत. या दुकानातून या शेतकऱ्यांना धान्याचा पुरवठा होत आहे. या सर्वच दुकानातून इतर लाभार्थ्यांना धान्य मिळत आहे. मात्र या विशेष पॅकेज योजनेतील लाभार्थी गेल्यास त्याला धान्य नसल्याचे सांगण्यात येते.
या योजनेतील धान्यसाठ्याकरिता जिल्हा पुरवठा विभागाकडून मागणी केली होती. ती मागणी नुकतीच मान्य झाली असून त्याची रक्कम भारतीय खाद्य निगमच्या खात्यात जमा करण्याची तयारी पुरवठा विभागाने सुरू केली आहे. आवश्यक रक्कम भरल्यानंतर तत्काळ धान्याचा पुरवठा होईल अथवा नाही, याची शाश्वती नाही. यामुळे योजनेतील धान्याकरिता शेतकरी कुटुंबांना आखणी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हे सांगणे कठीण आहे.

७५० मेट्रिक टन गहू आणि ५०० मेट्रिक टन तांदळाला मंजुरी
या योजनेतील लाभार्थ्यांना धान्य मिळावे याकरिता जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार ७५० मेट्रिक टन गहू आणि ५०० मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे. त्याकरिता आवश्यक रक्कम भरण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाकडून सुरू आहे. रक्कम भरल्यानंतरही हे धान्य किती दिवसात दुकानात पोहोचेल याची शाश्वती नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
खाद्य निगममध्ये हमालांचा घोळ
रक्कम भरून धान्यसाठा दुकानात पोहोचविण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा प्रयत्न करीत आहे; मात्र येथे हमालांची कमतरता असल्याने त्यांच्याकडून गाड्या लोड होण्याकरिता विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे रक्कम भरूनही शेतकऱ्यांना तात्काळ धान्य मिळेल याची शाश्वती नसल्याची खंत पुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या योजनेत आवश्यक असलेल्या धान्य साठ्याचे आवंटन नुकतेच मंजूर झाले आहे. त्याची रक्कम खाद्य निगमच्या खात्यात भरण्याची तयारी सुरू आहे. रक्कम वळती होताच दुकानात धान्य पोहोचण्याची व्यवस्था होणे अपेक्षित आहे; मात्र खाद्य निगममध्ये हमालांची असलेली कमतरता यात खोड ठरू शकते. यामुळे दुकानात धान्य पोहोचण्याकरिता आणखी किती दिवस लागतील हे सांगणे सध्या कटीण आहे.
- अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

Web Title: 49, 458 Farmers' Families Ways To Get Cheap Foodgrains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.