एम-किसानमध्ये ४.५६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:44 IST2017-07-19T17:44:58+5:302017-07-19T17:44:58+5:30
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता यावे म्हणून शासनाच्या कृषी विभागाने एम-किसान हे वेब पोर्टल तयार केले आहे.

एम-किसानमध्ये ४.५६ लाख शेतकऱ्यांची नोंदणी
महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता यावे म्हणून शासनाच्या कृषी विभागाने एम-किसान हे वेब पोर्टल तयार केले आहे. एम-किसानमध्ये नागपूर विभागात वर्धेसह सहा जिल्ह्यांतील ४ लाख ५६ हजार ४८३ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यात वर्धा जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागला आहे.
१० डिसेंबर २०१४ रोजी सदर वेब पोर्टल तयार करण्यात आले होते. वेब पोर्टल तयार झाल्यापासून आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात १ लाख २ हजार शेतकऱ्यांपैकी ६४ हजार ७०८ शेतकऱ्यांची एम-किसानसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातील कृषी विभागाद्वारे शेतीविषयक मार्गदर्शन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती एसएमएसद्वारे दिली जात आहे. आतापर्यंत कृषी विभाग वर्धाने जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना १६७ एसएमएस केले आहेत. अखेरचा एसएमएस ५ मे २०१७ रोजी पाठविण्यात आला आहे. या मॅसेमजधून वर्धा जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची माहिती देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
पुण्यात केली जाते नोंदणी
४एम-किसान नोंदणीचे जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने तालुक्यातून माहिती मागविली. त्यानंतर सदर माहिती पुण्याला पाठविण्यात आली. पुण्यातील अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील माहितीची नोंद घेत आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार ७०८ शेतकऱ्यांची नोंदणी केल्याचे सांगण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६० हजार शेतकऱ्यांची आम्ही नोंदणी केली आहे. त्यांना एसएमएसद्वारे योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले जात आहे. लवकरच जिल्ह्यातील पूर्ण शेतकऱ्यांना आम्ही यात सहभागी करून घेऊ.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा.