महिला रुग्णालयासाठी ४.५० कोटी मंजूर
By Admin | Updated: April 27, 2016 02:21 IST2016-04-27T02:21:07+5:302016-04-27T02:21:07+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात महिला रुग्णालय मंजूर होवून दोन वर्षांचा कालावधी झाला.

महिला रुग्णालयासाठी ४.५० कोटी मंजूर
आमदारांची माहिती : लवकरच सुरू होणार बांधकाम
वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात महिला रुग्णालय मंजूर होवून दोन वर्षांचा कालावधी झाला. त्याचे भूमिपूजनही झाले; मात्र शासनाकडून निधी आला नसल्याने बांधकाम रखडले होते. आता या महिला रुग्णालयाच्या बांधकामाला हिरवी झेंडी मिळाली आहे. बांधकामाकरिता ४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
वर्धेतील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात १०० खाटांचे महिला रुग्णालयाला २४ जून २०१३ रोजी मान्यता मिळाली. १३ आॅगस्ट २०१४ रोजी त्याची जागाही हस्तांतरीत करण्यात आली होती. रुग्णालयाच्या बांधकामासाठी १४ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. गत २२ महिन्यांपासून या रुग्णालयासाठी निधीची तजवीज झाली नसल्याने रुग्णालय होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. वर्धा शहर जिल्ह्याचे मुख्यालय असतानाही महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय नव्हते. त्यामुळे महिलांना उपचारादरम्यान अनेक अडचणी येत होत्या. याची माहिती आरोग्य मंत्र्यांना देण्यात आली असता त्यांनी निधी मंजूर केला. या रुग्णालयाकरिता ४.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आ. डॉ. भोयर यांना दिले. या रुग्णालय बांधकामाची निविदाही प्रकाशित करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाल्यामुळे रुग्णालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.(प्रतिनिधी)