पालखीचा ४,४०० किमी पायी प्रवास
By Admin | Updated: December 24, 2015 02:46 IST2015-12-24T02:46:19+5:302015-12-24T02:46:19+5:30
भक्ती! मग ती कुठल्याही देवाची वा धोरणाची, माणसाला प्रबळ इच्छाशक्ती प्रदान करते. ही बाब एका साईभक्ताने सिद्ध केली आहे.

पालखीचा ४,४०० किमी पायी प्रवास
साई भक्ताचा उपक्रम : तीन वर्षे होती दिंडी डोक्यावर
देवकांत चिचाटे नाचणगाव
भक्ती! मग ती कुठल्याही देवाची वा धोरणाची, माणसाला प्रबळ इच्छाशक्ती प्रदान करते. ही बाब एका साईभक्ताने सिद्ध केली आहे. गत तीन वर्षांपासून ४ हजार ४०० किमी पायी प्रवास करणाऱ्या या भक्ताची दखल शिर्डी येथील साई संस्थाननेही घेतली. प्रत्येक वर्षी दिंडी डोक्यावर घेऊन पायी प्रवास करणाऱ्या या भक्ताला यंदा ओढत घेऊन जाणे शक्य असलेली पालखी देण्यात आली आहे.
ओरीसा ते शिर्डी प्रवास तोदेखील पायी, ही बाब आश्चर्यकारकच आहे. ४ हजार ४०० किमीचा प्रवास करणारा २५ वर्षीय युवक बिशन तारणदास पुनरचंद हा ओरीसातील केव्हनजरी जिल्ह्यातील बोलानी येथील रहिवासी आहे. २०१० पासून तो प्रत्येक वर्षी न चुकता दिंडी डोक्यावर घेऊन ओरीसा ते शिर्डी असा पायी प्रवास करतो. आतापर्यंत तीन वेळा त्याने दिंडी डोक्यावर घेऊन पायी चालत जात शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेतले. बिशन आणि नाचणगावचे नाते या पायी दिंडीमुळे दृढ झाले आहे. आपल्या पायदळ प्रवासात बिशेनचा मुक्काम हा मिरा कॉलनी येथील साईमंदिरात साईतिर्थावर असतो. मंदिराचे अध्यक्ष वसंत वंडलकर तसेच श्याम राठी व नागरिक या दिंडींची पूजाअर्चा करून आवश्यक ती सेवा पुरविण्याचा प्रयत्न करतात.
हा साईभक्त दररोज ३० ते ४० किमीचा प्रवास करतो. १६ आॅगस्ट २०१५ रोजी घरून निघालेला बिशनदास २६ जानेवारी २०१६ रोजी ओरीसाला पोहोचणार असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले. या प्रवासात त्याला दोन महिने १८ दिवस शिर्डीला पोहोचण्यासाठी तर तेवढेच दिवस परत आपल्या गावी जाण्यासाठी लागत असल्याचेही त्याने सांगितले. बोलानी येथील मंदिरातून अखंड साईज्योत घेऊन तसेच प्रथमच शिर्डी येथून एकटा रथ ओढत निघालेला हा साईभक्त सोमवारी रात्री नाचणगाव येथे पोहोचला. तो साईमंदिरातून मलकापूर, वर्धा, बुटीबोरी, नागपूर या मुक्कामाच्या ठिकाणानंतर पूढे आपला प्रवास सुरू ठेवणार आहे.े