जिल्ह्यात ४३ टक्केच पेरण्या
By Admin | Updated: June 30, 2015 02:42 IST2015-06-30T02:42:45+5:302015-06-30T02:42:45+5:30
मान्सूनच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाचे आगमण होताच पेरण्याच्या कामांना वेग आला. असे

जिल्ह्यात ४३ टक्केच पेरण्या
दीड लाखावर कपाशी : ६२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा
वर्धा: मान्सूनच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाचे आगमण होताच पेरण्याच्या कामांना वेग आला. असे असले गत आठवड्यापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळल्याचे कृषी विभागाच्यावतीने गुरुवारपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. जिल्ह्यात केवळ ४३ टक्के पेरण्या झाल्याची नोंद यात आहे.
सोयाबीनच्या पेऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ असल्याने त्यांच्याकडून कपाशीची लागवड जोरात सुरू असल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ४९ हजार ५१५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याचे दिसून आले आहे. त्याची टक्केवारी ६२ आहे. तर ६१ हजार ३४१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. याची टक्केवारी ५५ टक्के आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यात निम्मी पेरणी शिल्लक असल्याचे दिसते.
जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. आलेला पाऊस पेरणीयोग्य असल्याने पेरा पूर्ण होईल असे वाटत होते; मात्र तसे झाले नाही. जून महिना संपण्याच्या मार्गावर आला असताना अद्यापही पूर्णत: पेरा झाला नसल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षनानंतरच्या चार दिवसात आणखी किती पेरा झाला याची माहिती त्यांच्याकडे आली नाही.(प्रतिनिधी)
कृषी विभागाकडे नोंद झालेल्या पेरणीनुसार जिल्ह्यात सोयाबीनच्या पेऱ्याकडे शेतकऱ्यांनी अद्यापही पाठ असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीनच्या पेऱ्याची टक्केवारी ५५ असल्याचे दिसून आले आहे. यामुळे नियोजनाच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा निम्माच झाल्याचे दिसून आले आहे. याचे महत्त्वाचे कारण बेभरवशाचा पाऊस असल्याचे दिसून आले आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४९ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याचे दिसून आले आहे. त्याची टक्केवारी ६२ टक्के आहे. कपशीसोबतच शेतकऱ्यांनी तुरीची लागवडही केली. जिल्ह्यात ३१ हजार १०१ हेक्टरवर तूर लावण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ४७ आहे.
या व्यतिरिक्त ज्वारी वगळता इतर कोणत्याही तालुक्यात ज्वारीचा पेरा झाल्याचे दिसून आले नाही. त्याची टक्केवारी ०.६७ एवढी आहे.
पीक विमा योजनेची आज अंतिम तारीख
निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांना होत असलेले नुकसान टाळण्याकरिता हवामान आधारित पीक विमा योजना उतरविण्यात येत आहे. या योजनेचा गत वर्षी शेतकऱ्यांना लाभ झाला होता. त्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली होती. या योजनेचा लाभ घेण्याकरिता नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.
या योजनेची अंतिम तारीख मंगळवार (३० जून ) आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.