मतदानासाठी ४,२२९ कर्मचाऱ्यांची फौज सज्ज
By Admin | Updated: February 15, 2017 02:11 IST2017-02-15T02:11:45+5:302017-02-15T02:11:45+5:30
वर्धेत पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांकरिता १६ फेब्रुवारीला मतदान होत आहे.

मतदानासाठी ४,२२९ कर्मचाऱ्यांची फौज सज्ज
२६९ वाहनांची व्यवस्था : शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता २,२०५ पोलीस
वर्धा : वर्धेत पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांकरिता १६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीकरिता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक गटात आणि गणात मतदानप्रक्रिया सुरळीत व्हावी, याकरिता जिल्ह्यातील ४ हजार २२९ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे कर्मचारी आज बुधवारी सकाळी तालुका स्तरावरून त्यांना देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहे.
जिल्ह्यात होऊ घातलेली निवडणूक सुरळीत पार पाडण्याकरिता पोलीस विभागाचीही तयारी पूर्ण झाली आहे. या कामाकरिता वर्धेसह बाहेर जिल्ह्यातूनही कुमक मागविण्यात आली आहे. या कामाकरिता एकूण २ हजार २०५ पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. यात पाच उपविभागीय पोलीस अधिकारी १० पोलीस निरीक्षक, ५९ पोलीस उपनिरीक्षक, १ हजार २११ पोलीस कर्मचारी, २२० नवप्रविष्ट कर्मचारी, ७०० सैनिक आणि त्यांच्या मदतीला एक एसआरपीएफचे प्लाटून देण्यात आले आहे. तसेच या कामाकरिता दंगल नियंत्रण पथकही नियुक्त करण्यात आले आहे.
निवडणुकीकरिता निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांना देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर पोहोचविण्याकरिता २६९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांच्या माध्यमातून त्यांना ९६१ केंद्रांवर पोहोचविण्यात येणार आहे. यात राज्य परिवहन महामंडळाच्या ९० बसेस, १७३ जीप व सहा ट्रकचा वापर करण्यात येणार आहे. या वाहनातून त्यांना बुधवारी सकाळी प्रत्येक तालुका स्तरावरून त्यांच्या केंद्रावर नेणार असून गुरुवारी मतदानानंतर परत आणणार आहे.
जिल्ह्यातील आष्टी (शहीद) तालुक्यतील ६८ केंद्रांकरिता ३०० कर्मचारी असून त्यांना पोहोचविण्याकरिता १९ वाहनांची व्यवस्था आहे. यात नऊ बस आणि १० जीप आहेत. कारंजा (घाडगे) येथील ८७ केंद्रावर असलेल्या ३८३ कर्मचाऱ्यांना पोहोचविण्याकरिता १९ वाहने आहेत. यात सात बस आणि १२ जीपचा समावेश आहे. आर्वी येथील ११५ मतदसन केंद्रावरील ५०७ कर्मचाऱ्यांना पोहोचविण्याकरिता २४ वाहने आहेत. यात सहा बस, १६ जीप आणि दोन ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील १११ केंद्रावर ४८८ कर्मचाऱ्यांना पोहोचविण्याकरिता ५९ वाहनांची व्यवस्था केली आहे. यात १३ बस आणि ४६ जीपचा समावेश आहे.
वर्धा तालुक्यातील २०९ केंद्रावरील ९२० कर्मचाऱ्यांना केंद्रावर पोहोचविण्याकरिता ३९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात १९ बस आणि २० जीपचा समावेश आहे. समुद्रपूर तालुक्यतील १३५ केंद्रावर निवड झालेल्या ५९२ कर्मचाऱ्यांना केंद्रावर नेण्याकरिता ३९ वाहनांची व्यवस्था असून यात १२ बस, २५ जीप व दोन ट्रकचा समावेश आहे. देवळी तालुक्यात ११० केंद्रावरील ४८४ कर्मचाऱ्यांना नेण्याकरिता ३३ वाहने असून यात १२ बस, १९ जीप आणि दोन ट्रकचा समावेश आहे. तर हिंगणघाट येथील १२६ केंद्रावर ५५५ कर्मचाऱ्यांना नेण्याकरिता ३७ वाहने असून यात १२ बस आणि २५ जीपचा समावेश असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली आहे.
या वाहनातून निवडणुकीकरिता निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या केंद्रावर पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
बुधवारी डोअर टू प्रचार, गुरुवारी मतदान
जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या खुल्या प्रचाराला मंगळवारी रात्री विराम बसला. हा विराम बसण्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक गट व गणांत उमेदवारांनी प्रचार रॅल्या काढल्या. कोणी दुचाकी रॅली काढली तर कुणी ढोल ताश्याच्या निणादात पायी रॅली काढूून आपल्या प्रचाराला विराम दिला. शासनाच्या सूचनेनुसार खुल्या प्रचाराची मुभा मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत होती. यात काही उमेदवारांनी गावपातळीवर सभाही आटोपल्या. खुल्या प्रचारानंतर उमेदवारांनी रात्रीतूनच आपल्या प्रभागात पायी वाऱ्या सुरू करण्याचे नियोजन आखले. तत्पूर्वी बुधवारी शक्य असलेल्या भागात ‘डोअर टू डोअर’ प्रचाराचे अनेकांचे नियोजन आहे. प्रचारानंतर कोणता भाग आपला आणि कोणत्या कार्यकर्त्याला जवळ करायचे याची चर्चा उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात सुरू असल्याचे दिसून आले. कोणत्या भागात आपल्याला अधिक मते मिळणार, मागे असलेल्या परिसरात काय करावे या नियोजनावर उमेदवारांसह कार्यकर्त्यांत चर्चा होताना दिसून आली.