संपर्कातील ४१ व्यक्ती निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:33+5:30
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. इतकेच नव्हे तर हिवरा तांडा परिसरात कंटेन्टमेंट व बफर झोन तयार करून एकूण १३ गावे सील करीत त्या गावांमधील व्यक्तींमध्ये ताप, सर्दी, खोकला व घसादुखीची लक्षणे आहेत काय, याची शहानिशा आरोग्य विभागाच्या २५ विशेष चमूच्या सहाय्याने केली जात आहे.

संपर्कातील ४१ व्यक्ती निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे तर सावंगी (मेघे) येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी एकूण ४१ व्यक्तींचे अहवाल वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले असून ते सर्व कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरित १८ व्यक्तींच्या नमुन्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती वर्धा जिल्हा कोविड सेंटर समन्वयक डॉ. सचिन ओंम्बासे यांनी दिली आहे.
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. इतकेच नव्हे तर हिवरा तांडा परिसरात कंटेन्टमेंट व बफर झोन तयार करून एकूण १३ गावे सील करीत त्या गावांमधील व्यक्तींमध्ये ताप, सर्दी, खोकला व घसादुखीची लक्षणे आहेत काय, याची शहानिशा आरोग्य विभागाच्या २५ विशेष चमूच्या सहाय्याने केली जात आहे. दम्याचा आजार असलेली ही महिला सुरूवातीला आर्वी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. तर नंतर तिला तिच्या कुटुंबीयांनी आर्वी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यात कोरोनाची लक्षणे आढल्यानंतर तिला तातडीने सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. पण त्यानंतर तिचा घशातील द्रवाच्या नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. शिवाय तिच्या निकट संपर्कात आलेल्या एकूण २८ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. या २८ पैकी २३ व्यक्तींचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला असून ५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
तर वाशीम जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या एक ६४ वर्षी रुग्ण उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर त्याचा स्वॅब घेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येताच त्याच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी १८ व्यक्तींचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला असून १३ व्यक्तींच्या अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. हे दोन्ही रुग्ण रविवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतरच्या ४८ तासांत एकही संशयीत कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही.
महिलेचे कुटुंबीय निगेटिव्ह
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या एकूण २८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यात सदर मृत महिलेल्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. या महिलेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले.
४,३८६ व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का कायम
आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्राततून वर्धा जिल्ह्यात २३ हजार ७२८ व्यक्ती आलेत. या सर्व व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. त्यापैकी १९ हजार ३४२ व्यक्तींमध्ये होम क्वारंटाईन कालावधीत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने त्यांची गृहविलगीकरणातून मुक्तता करण्यात आली आहे. तर सध्यास्थितीत ४ हजार ३८६ व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का कायम असून त्यांच्यावर आरोग्य विभागातील तज्ज्ञ लक्ष ठेऊन आहेत.
कन्टेमेंट झोनमधील २८ व्यक्तींमध्ये आढळले ताप, सर्दी, खोकल्याची सौम्य लक्षणे
हिवरा तांडा परिसरात कन्टेमेंट व बफर झोन तयार करून आरोग्य विभागाच्या २५ चमूकडून गृहभेटी देऊन कुठल्या व्यक्तीमध्ये सर्दी, ताप, खोकला व घसादुखीची लक्षणे आहेत काय याची माहिती घेतली जात आहे. मृत महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्यांदा कंटेन्टमेंट झोनमध्ये ही मोहीम रविवारी व सोमवारी राबवून ७२९ घरांना भेटी देऊन ३ हजार ६५२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी २८ व्यक्तींमध्ये ताप, सर्दी, खोकला व घसादुखीची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचार देऊन होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर व्यक्तींवर आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांकडून पाळत ठेवली जात आहे.
हैबतपूरच्या वसतिगृहात ४९ तर शासकीय तंत्रनिकेतमध्ये २४ व्यक्ती क्वारंटाईन
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्त्राव कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. तसेच कुटुंबातील ११ व्यक्तींना उपजिल्हा रुग्णालयात अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याशिवाय ४९ व्यक्तींना हैबतपूर येथील समाजकल्याण वसतिगृहात तर २४ व्यक्तींना शासकीय तंत्रनिकेतन मध्ये संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. कमी संपर्कात आलेल्या ८५ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
वाशीमच्या रुग्णाच्या मुलाचा अहवाल प्रलंबीत
वाशिम जिल्ह्यातून सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीसाठी नमुने पाठविलेल्या व्यक्तींमध्ये रुग्णाच्या दोन मुलांसह डॉक्टर व नर्स तसेच अन्य व्यक्तींचा समावेश आहे. या ३१ पैकी १८ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले असून रुग्णाच्या एक मुलगा कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. तर रुग्णाच्या दुसºया मुलाच्या अहवालाची आरोग्य यंत्रणेला प्रतीक्षा आहे.
११५ अहवाल रखडले
सध्यास्थितीत एकूण १६६ व्यक्ती आयसोलेशनमध्ये असून मंगळवारी ४९ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. तर आज ९७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ५६० व्यक्तींचे स्वॅप तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये हिवरा तांडा येथील मृत महिलेसह सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या वाशीम जिल्ह्यातील रुग्णाचा समावेश आहे. तर उर्वरित ११५ अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे.
हिवरा तांडा येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या २८ लोकांचे घशातील द्रवाचे नमुने सोमवारी सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे असले तरी या सर्व व्यक्तींना पुढील १४ दिवस आयसोलेशन तसेच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा.
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला आर्वीतील कोविड योद्धांशी संवाद
आर्वी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर आर्वी तालुक्यात ग्रामीण भागात काम करणाऱ्या कोविड योद्धांशी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे केल्या जात असलेल्या कामाचे कौतुक केले. शिवाय अधिक सतर्क राहून काम करण्याच्या सूचना दिल्यात. व्हिडीओ कॉन्फरंसिंगला जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले तसेच जि.प. अध्यक्ष सरिता गाखरे आदींची उपस्थिती होती.