कवडीमोल भावामुळे ४० टक्के संत्रा झाडाला; शेतकऱ्यांची वाढली अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST2020-12-07T05:00:00+5:302020-12-07T05:00:33+5:30
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसानंतर जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम राहल्याने यंदा संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला. बदलत्या वातावरणामुळे फळगळ झाली. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा संत्रा उत्पादनात घट आली असून समाधानकारक भाव मिळेल अशी आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. परंतु, शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येताच भाव गडगडल्याने संत्रा उत्पादकांसह छोट्या व्यापाऱ्यांना सध्या आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

कवडीमोल भावामुळे ४० टक्के संत्रा झाडाला; शेतकऱ्यांची वाढली अडचण
पुरूषोत्तम नागपुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : देश-विदेशात वेगळी ओखळ निर्माण करणारी नागपूरची संत्रा यंदा कवडीमोल भावात विकली जात आहे. परप्रांतीय बाजारपेठत केवळ १० ते १५ रुपये प्रती किलो भाव सध्या संत्राला मिळत असल्याने परिसरात ४० टक्के संत्रा झाडालाच असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. भाव गडगडल्याचा आर्थिक फटका छोट्या व्यापाऱ्यांसह आर्वी भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसानंतर जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम राहल्याने यंदा संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला. बदलत्या वातावरणामुळे फळगळ झाली. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा संत्रा उत्पादनात घट आली असून समाधानकारक भाव मिळेल अशी आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. परंतु, शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येताच भाव गडगडल्याने संत्रा उत्पादकांसह छोट्या व्यापाऱ्यांना सध्या आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यंदाच्या वर्षी सुरूवातीला सततच्या पावसामुळे सोसाबीन तर नंतर गुलाबी बोंड अळीमुळे कपाशी पीक हातचे गेले. अशातच संत्रा पीक आधार देईल अशी आशा असताना भाव गडगडल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
तालुक्यात ७०० हेक्टरवर संत्रा
आर्वी तालुक्यातील सुमारे १ हजार २५० शेतकऱ्यांनी ७०० हेक्टरवर संत्रा पिकाची लागवड केली आहे. यापैकी ५० टक्के शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी संत्राची लागवड केली आहे. पण भाव गडगडल्याने ४० टक्के संत्रा सध्या झाडावरच आहे.
ढगाळी वातावरणामुळे संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. इतकेच नव्हे तर सध्या संत्राचे भाव पडल्याने आमच्या अडचणीत भर पडली आहे. या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या संत्र्याला योग्य भाव देत त्याची खरेदी करून हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- राजू कदम,संत्रा उत्पादक, देऊरवाडा.