४० कुटुंब टिनपत्र्याच्या शेडमध्ये

By Admin | Updated: April 26, 2016 01:48 IST2016-04-26T01:48:50+5:302016-04-26T01:48:50+5:30

तळपते उन्ह.. रात्रीला वीज नाही.. घर गाठण्याकरिता रस्ता नाही.. पिण्याकरिता पाणी नाही.. घराच्या नावावर आठ बाय

40 family tinplate sheds | ४० कुटुंब टिनपत्र्याच्या शेडमध्ये

४० कुटुंब टिनपत्र्याच्या शेडमध्ये

 आर्वी : तळपते उन्ह.. रात्रीला वीज नाही.. घर गाठण्याकरिता रस्ता नाही.. पिण्याकरिता पाणी नाही.. घराच्या नावावर आठ बाय आठचा टिनाचाच ठेला.. या स्थितीत जीवन जगण्याची वेळ नेरी पुनर्वसन येथील ४० कुटुंबियांवर आली आहे. गत आठ वर्षांपासून या वेदना सहन करीत त्यांना जीवन जगावे लागत आहे. शासनाच्या योजनेत इतरांचे भले करण्याची ही शिक्षाच आम्हाला भेटत असल्याच्या प्रतिक्रीया त्यांच्या तोंडून व्यक्त होत आहे.
कुठलेही पुनर्वसन करताना तेथील नागरिकांना सर्वच नागरी सुविधा देण्याचा शासनाचा दंडक आहे. असे असताना निम्न वर्धा धरणात जमिनी व घर गेलेल्यांचे पुनर्वसन करताना त्यांना कुठल्याही नागरी सुविधा देण्यात आल्या नसल्याचे दिसून आले आहे. सुविधा मिळाविण्याकरिता येथील नागरिकांनी शासनदरबारी लढा दिला; मात्र त्यांच्याकडून यावर कुठलाही मार्ग निघाला नाही. घर म्हणून आठ बाय आठचा टिनाचा ठेला. यात ४४ अंशावर पोहोचलेला उन्हाचा पारा. या सर्व परिस्थितीत येथील कुटुंब कसे राहत असेल याचा विचारही थरकाप उडवितो. या गावात पाय ठेवताच येथील भीषणता सर्वच सांगून जाते.

आमचे घर प्रकल्पात गेले, शासनाने जे काही पैसे दिले त्यात घर झाले नाही. शिवाय कुटुंबाचे आजारपण यात पैसा हातचा निघून गेला. सध्या टिनाच्या शेडमध्ये अंधारात जगत आहोत. शासनाच्या योजनेत घर दिले त्याचेच फळ भोगत आहोत.
- भास्कर सहारे

आमच्याकडे काही शेती नाही. जुन्या गावात आमचं स्वत:चं घर होतं, परंतु जागा धरणात गेल्याने आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.
- नर्मदा मुंदरे

आम्हाला राहायला पक्के घर नसल्याने आठ वर्षांपासून टिनाच्या शेडमध्ये अंधारात राहतो. आमची साधी दखलही संबंधित विभाग घेत नाही.
- रमेश कोहरे

इथं राहायला आलो तेव्हापासून अंधारात राहतो. रात्री अपरात्री बाहेर निघता येत नाही. पावसाळ्यात तर घरात पावसाचे पाणी साचते तर उन्हाळ्यात टिनाचे चटके सोसावे लागतात.
- कुसुम कामडी

पुनर्वसन झाल्यापासून नेरी गावात समस्या वाढत आहे. शासनाने पुनर्वसन तर केले मात्र सोईसुविधा दिल्या नाही. सोईसुविधेच्या नावावर समस्याच वाढल्या.
-बाळा सोनटक्के
ग्रामपंचायत सदस्य, नेरी पुनर्वसन ता. आर्वी

Web Title: 40 family tinplate sheds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.