जुनगडच्या ४० कुटुंबांना गॅस जोडणीची प्रतीक्षा कायम
By Admin | Updated: July 30, 2015 01:54 IST2015-07-30T01:54:38+5:302015-07-30T01:54:38+5:30
जंगलाशेजारील गावांमध्ये गॅस जोडणी देण्याची योजना वन विभागाकडून राबविली जात आहे. यात अनेक ग्रामस्थांना गॅस जोडणीचा लाभ मिळाला; ...

जुनगडच्या ४० कुटुंबांना गॅस जोडणीची प्रतीक्षा कायम
तीन वर्षांपूर्वी भरली अनामत : निधी येत नसल्याने वनविभागाची अडचण
वर्धा : जंगलाशेजारील गावांमध्ये गॅस जोडणी देण्याची योजना वन विभागाकडून राबविली जात आहे. यात अनेक ग्रामस्थांना गॅस जोडणीचा लाभ मिळाला; पण गत तीन वर्षांपासून जुनगड येथील ग्रामस्थांना गॅस जोडणीच देण्यात आली नाही. यामुळे संतप्त ४० कुटुंबांनी बुधवारी उपवन संरक्षक कार्यालयावर धडक दिली; पण उपवन संरक्षक मुकेश गणात्रा यांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्यास नकार दिला.
केळझर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जुनगड येथील सुमारे ४० कुटुंबांनी २०१३ मध्ये गॅस जोडणीकरिता अनामत रक्कम अदा केली. वन विभागाच्या सांगण्यावरूनच सदर ग्रामस्थांनी प्रत्येकी २४०० रुपये गॅस जोडणीसाठी अदा केले. यानंतर आज ना उद्या गॅस जोडणी मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती; पण तीन वर्षांचा कालावधी लोटला असताना ग्रामस्थांना गॅस जोडणी देण्यात आलेली नाही. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार केळझर येथील वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला; पण तेथून टाळाटाळच करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी वाघमारे यांनाही अनेकदा ग्रामस्थांनी विचारणा केली. यावर सदर कार्यालयातून तुमचे पैसे परत घेऊन जा, गॅस जोडणी देण्यास वनविभाग असमर्थ आहे, असेच सांगण्यात आले. तीन वर्षांपूर्वी रक्कम अदा करूनही गॅस जोडणी दिली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.
अनामत रक्कम अदा करूनही गॅस जोडणी मिळत नसल्याने बुधवारी जुनगड येथील ३० ते ४० महिला पुरूषांनी प्रथम जिल्हाधिकारी कर्यालय व नंतर उपवन संरक्षक कार्यालय गाठले; पण तेथे अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी ठिय्या दिला. परंतु उपवन संरक्षक गणात्रा यांनी कार्यालयात आल्यावरही तुमची समस्या माहीत आहे असे म्हणत ग्रामस्थांना भेटण्यास नकार दिला. पैसे परत नको, गॅस जोडणी द्या अशी भूमिका घेत जुनगडच्या ग्रामस्थांनी भेटीस नकार दिल्याने संताप व्यक्त केला.(कार्यालय प्रतिनिधी)