३.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: March 26, 2017 01:03 IST2017-03-26T01:03:10+5:302017-03-26T01:03:10+5:30
दारूबंदी जिल्ह्यात वाहनारे दारूचे पाट कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. कारवाई होत असतानाही दारूविक्रेते जुमानत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

३.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखेची कारवाई : पोलिसांनी कारला सिनेस्टाईल अडविले
वर्धा : दारूबंदी जिल्ह्यात वाहनारे दारूचे पाट कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. कारवाई होत असतानाही दारूविक्रेते जुमानत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी नाकाबंदी करून कारसह ३ लाख ९७ हजार रुपयांची दारू जप्त केली.
प्राप्त माहितीवरून गुन्हे शाखेने जुनापाणी चौकात नाकाबंदी केली. दरम्यान, कार क्र. एमएच ३१ एएच ७७३३ येत असल्याचे दिसते. तिला थांबण्याचा इशारा केला असता न थांबता वेगाने शांतीनगर चौकाकडे पळून गेली. यामुळे तिचा पाठलाग करून केशव सिटी परिसरात गाडी पकडली. आरोपी पळत असता पाठलाग करून आरोपी रवी देशमुख हाती आला तर रियाज उर्फ जमील पळून गेला. देशमुख याच्या ताब्यातून कार क्र. एमएच ३१ एएच ७७३३ तसेच गाडीच्या डिक्कीमध्ये असलेली विदेशी दारू, बियर व देशी दारू असा एकूण ३ लाख ९७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार उदयसिंग बारवाल, अमर लाखे, दिवाकर परिमल, आनंद भस्मे, सचिन खैरकार, समिर कडवे यांनी केली. गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांतर्गत वारंवार दारू जप्त करीत विक्रेत्यांना जेरबंद केले जाते; पण कुठलीही दारू बंद होत नाही. सर्वाधिक दारू या बंदी असलेल्या जिल्ह्यातच विकली जाते, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.(कार्यालय प्रतिनिधी)
सरपंच व पोलीस पाटलांनी टाकली दारूविक्रेत्यांच्या घरी धाड
वडनेर - शेकापूरसह पिपरी, धानोरा, पोहणा, धोची, सिरसगाव (बाजार), कुटकी, दारोडा, काचनगाव, आर्वी, वडनेर, खापरी, टेंभा आदी अनेक गावांत दारूविक्री सुरू आहे. दारूविके्रते निर्ढावले असून एका शिपायाला दगड मारून जखमीही करण्यात आले होते. यामुळे पोलिसांनीच दारूविक्रेत्यांना वठणीवर आणणे गरजेचे आहे.
शेकापूर (बाई) येथे खुलेआम दारूविक्री करणाऱ्या महिलेला सरपंच, पोलीस पाटलांनी धाड टाकून मुद्देमालासह पोलिसांना पकडून दिले. दारूविक्रेता रमेश अबाडकर फरार असून वडनेर पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत दारूविक्रेत्या पती-पत्नी गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. शेकापूर येथील रमेश अबाडकर व त्याची पत्नी हे दोघही गत सहा महिन्यांपासून दारूविक्री करीत आहे. पोलिसांशी सलगी असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नव्हती.
हा प्रकार पाहून सात महिलांनीही दारूविक्री सुरू केली. गुरूवारी एक शिपाई वसुलीसाठी आला. त्याने हप्ता न देणाऱ्याची दारू पकडली व अबाडकर यास सहकार्य केले. यामुळे सरपंच देविदास पाटील, पोलीस पाटील योगेश झाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गजानन डुकरे, महेंद्र लोखंडे धानोरा, गुलाब खेकारे, अमोल खेकारे, जयपाल पाटील यासह शेकडो नागरिकांनी अबाडकर यांच्या घरी धाड टाकली. ठाणेदार वासेकर यांना बोलविले. पोलिसांनी घरातील दिवान, धान्याच्या कोठीतून देशी, विदेशी व मोहा दारू जप्त केली.
यावेळी पोलीस कर्मचारी हप्ता घेताना दिसला तर मला संपर्क करा वा कुणी दारूविक्री करीत असल्यास माझ्याकडे तक्रार करा, मी त्वरित कारवाई करील, असे ठाणेदार वासेकर यांनी सांगितले. रमेश अबाडकर व त्याची पत्नी हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.